काही जणांचा चेहरा इतका संवेदनशील असतो की बोट लावले, थोडं चोळलं किंवा थंड-उष्ण बदल झाला तरी त्वचा लगेच गुलाबी किंवा लालसर दिसू लागते. अनेकदा याकडे गोरी त्वचा, नाजूक त्वचा किंवा सौंदर्याचं लक्षण म्हणून पाहिलं जातं. (Your cheeks turn pink in the cold? it's a sign of nutritional deficiency - see the serious forms)पण प्रत्यक्षात हे नेहमीच सौंदर्याचं चिन्ह नसून, अनेक वेळा ते शरीरातील काही कमतरता किंवा अंतर्गत असंतुलनाचं लक्षण असू शकतं. गाल छान गुलाबी होतात असे वाटत असेल तर तसे नसून ती त्वचेतील कमतरता आहे हे समजून घ्या.
त्वचा लाल होण्यामागचं सर्वात सामान्य कारण म्हणजे रक्तवाहिन्यांची अतीसंवेदनशीलता. त्वचेखालील बारीक केशवाहिन्या फार नाजूक असतील तर अगदी हलक्याशा स्पर्शानेही त्या फुगतात आणि त्या भागात रक्तप्रवाह वाढतो. यामुळे त्वचा लगेच लाल किंवा गुलाबी दिसू लागते. ही स्थिती अनेकदा शरीरातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे उद्भवते.
यातील एक महत्त्वाची कमतरता म्हणजे आयर्न (लोह). शरीरात आयर्न कमी असेल तर रक्ताची गुणवत्ता बदलते, ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते आणि त्वचा जास्त संवेदनशील होते. त्यामुळे स्पर्श, उष्णता किंवा थंडीला त्वचा पटकन प्रतिक्रिया देते. यासोबतच व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक अॅसिडची कमतरता असेल तरी त्वचा नाजूक, लालसर आणि चुरचुरीत वाटू शकते. व्हिटॅमिन 'सी'ची कमतरताही त्वचा लाल होण्यास कारणीभूत ठरु शकते. व्हिटॅमिन सी हे केशवाहिन्यांना मजबूत ठेवण्याचे काम करते. त्याचा अभाव झाला तर रक्तवाहिन्या कमकुवत होतात आणि थोड्याशा दाबानेही त्या स्पष्ट दिसू लागतात. परिणामी, चेहर्यावर सहज लालसरपणा दिसून येतो.
काही वेळा हा लालसरपणा अॅलर्जी किंवा त्वचेच्या दाहाशी संबंधित असतो. सतत केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधने, हार्ड फेसवॉश, साबण, स्क्रब किंवा रासायनिक क्रीमचा वापर केल्यामुळे त्वचेचा नैसर्गिक संरक्षण थर कमी होतो. अशा त्वचेला जरा स्पर्श केला तरी ती लाल पडते. ही स्थिती सौंदर्य वाढवणारी नसून त्वचेसाठी इशाराच असतो. हार्मोनल असंतुलन हेही एक महत्त्वाचं कारण आहे. थायरॉईडचे विकार, पीसीओडी, मासिक पाळीतील बदल, प्रेग्नन्सी किंवा मेनोपॉजच्या काळात हार्मोन्स बदलल्यामुळे त्वचेतील रक्तप्रवाहात अचानक बदल होतात. त्यामुळे चेहरा पटकन लाल होणे, गरम होणे किंवा जळजळ होण्याच्या शक्यता असते.
डिहायड्रेशनमुळे त्वचा गुलाबी होते. काही वेळा ही लक्षणे रोसासिया (Rosacea) या त्वचारोगाची सुरुवातही असू शकतात. या आजारात चेहरा लालसर होणे, बारीक रक्तवाहिन्या दिसणे, उष्णता जाणवणे अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे सतत चेहरा लाल होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.
