Constant Sleepiness Lethargic Fatigued: झोप ही एक अशी बाब आहे जी सगळ्यांनाच प्रिय असते. प्रिय असणं हा भाग वेगळा. पण पुरेशी आणि चांगली झोप आपल्या मशिनरूपी शरीरासाठी सुद्धा महत्वाची असते. पण हल्ली बदललेल्या लाइफस्टाईलमुळे आणि धावपळीच्या जीवनामुळे सगळ्यांनाच पुरेशी झोप मिळते असे नाही. अलिकडे अनेकांना झोपेसंबंधी अनेक समस्या बघायला मिळतात. जसे की, रात्री लवकर झोप लागत नाही, झोप घ्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. याचा परिणाम असा होतो की, मग दिवसभर सतत झोप आल्यासारखं वाटत राहतं. आळस येत राहतो. आपल्यासोबतही अनेकदा असं होत असेल. पण असं का होतं याचं कारण आपल्याला माहीत नसेल. यामागचं कारण एका व्हिटामिनची कमतरता असू शकतं. ते कोणतं हे जाणून घेऊया.
रात्री झोप पूर्ण झाली नाही, अशी तक्रार बहुतेक लोक दुसऱ्या दिवशी सकाळी करतात. पण हे काही सामान्य लक्षण नाहीये. ही समस्या होण्यामागे आपल्या शरीरात व्हिटामिन बी १२ ची कमतरता असू शकतं. हे व्हिटामिन शरीरात कमी झालं की, झोपेसंबंधी वेगवेगळ्या समस्या आपोआप डोकं वर काढतात. अशात हे व्हिटामिन कमी झाल्यावर कोणती लक्षणं दिसतात हेही जाणून घेऊ.
व्हिटामिन बी१२ कमी झाल्याची लक्षणं
रात्रभर झोपूनही दिवसभर सुस्ती जाणवत असेल किंवा सतत झोप येत असेल तर हे लक्षण व्हिटामिन बी१२ कमी झाल्याचं आहे. व्हिटामिन बी१२ च्या कमतरतेमुळे शरीरात ऊर्जा कमी निर्माण होते. याचा अर्थ हा आहे की, सतत थकवा आणि कमजोरी जाणवत राहते. सतत झोप येत राहते. आळस येतो.
हाय - पायांना टोचल्यासारखं वाटणे
हात किंवा पायांमध्ये सुई टोचल्यासारखं जाणवणे किंवा सुन्नपणा व झिणझिण्या जाणवणे अशी लक्षणंही व्हिटामिन बी१२ कमी झाल्यावर दिसू शकतात. त्याशिवाय व्हिटामिन बी१२ कमी झाल्याने चिडचिड सुद्धा जाणवते. इतकंच नाही तर त्वचेचा रंग जर पिवळा दिसत असेल तर हेही व्हिटामिन बी१२ कमी झाल्याचं लक्षण आहे.
व्हिटामिन बी१२ कसं मिळवाल?
व्हिटामिन बी१२ ची कमतरता दूर करण्यासाठी डाएट प्लानमध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. दूध, दही पनीर आणि लोणी सारख्या डेअरी प्रॉडक्ट्सचा आहारात समावेश करून या व्हिटामिनची कमतरता दूर करू शकता. चांगला परिणाम मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात आणि योग्य आहाराची निवड करणं खूप महत्वाचं ठरेल. यासाठी आपण डॉक्टरांचा देखील सल्ला घेऊ शकता.
