Hot Water Bathing Tips : आंघोळ स्वच्छतेसाठी रोजची एक चांगली सवय असते. चांगल्या त्वचेसाठी, निरोगी राहण्यासाठी, शरीरावरील धूळ-माती साफ करण्यासाठी रोज आंघोळ केली जाते. तसेच आंघोळ केल्याने स्नायूंना आराम मिळतो, ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि एनर्जी सुद्धा मिळते. पण बरेच लोक महिला असोत वा पुरूष आंघोळ करताना काही कॉमन चुका करतात, ज्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा धोका वाढतो. थंडीपासून बचावासाठी आणि शरीर मजबूत करण्यासाठी बरेच लोक गरम पाण्याने आंघोळ करतात. पण गरम पाण्याने आंघोळ करताना सर्रास एक चूक केली जाते. ती म्हणजे जास्त गरम पाणी डोक्यावर टाकणे. असं केल्याने चेहरा आणि डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं.
डोळ्यांसाठी घातक सवय
आयुर्वेदानुसार, आंघोळ करताना जर डोक्यावर जास्त गरम पाणी ओतलं तर डोळ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. डोळे हे शरीरातील सगळ्यात संवेदनशील अवयव आहेत. जास्त उष्णतेमुळे पाण्यामुळे दृष्टीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. खासकरून वाढत्या वयात हा धोका अधिक असतो. काही केसेसमध्ये डोळ्यांमध्ये जळजळ, कोरडेपणा किंवा इतरही काही समस्या होऊ शकतात. याच कारणाने आंघोळ करताना डोक्यावर जास्त गरम पाणी न टाकण्याचा सल्ला दिला जातो. जर आपण केसांना तेल लावून मालिश केली असेल तर डोक्यावर अजिबातच जास्त गरम पाणी टाकू नये. डोक्यावर टाकण्यासाठी कोमट पाणी वापरावं.
भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आयुर्वेदाच्या आधारावर याबाबत माहिती शेअर केली आहे. आयुष मंत्रालयाने स्पष्टच सांगितलं आहे की, डोक्यावर जास्त गरम ओतल्याने डोळ्यांचं आणि एकंदर आरोग्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. केवळ डोळ्यांचंच नाही तर केसांचं देखील मोठं नुकसान होतं.
आयुर्वेदातही सांगण्यात आलं आहे की, डोक्यावर जर जास्त गरम पाणी घेतलं तर डोळे प्रभावित होतात. दृष्टी कमजोर होऊ शकते. जर नेहमीच असं केलं तर डोळ्यांसंबंधी इतरही अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. यामुळे शरीरासाठी गरम पाणी वापरू शकता, पण डोकं धुण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचाच वापर केला पाहिजे. खासकरून तेलाने मालिश केल्यानंतर.
त्वचेचं आणि केसांचं नुकसान
बऱ्याच लोकांना खूप जास्त गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. पण जर जास्त गरम पाण्याने आंघोळ केली तर त्वचेवरील नॅचरल ऑइल नष्ट होतं, ज्यामुळे शरीरात वात, पित्त आणि कफ दोष असंतुलित होतात. त्वचा जास्त कोरडी होते. त्वचेसंबंधी इतरही समस्या होतात. तसेच जास्त गरम पाण्याने केसांचं देखील नुकसान होतं. केस कमजोर होऊन गळतात. केस तुटतात, तसेच रखरखीत दिसतात. त्यामुळे आंघोळीसाठी नेहमीच कोमट पाण्याचा वापर केला पाहिजे. पाणी इतकंच गरम असावं की, शरीराला आराम मिळेल, चकटे लागू नये.
