ग्रूमिंगचा एक अतिशय महत्त्वाचा भाग असल्याने प्रत्येक महिला दरमहिन्याला थ्रेडिंग, आयब्रो करते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, हे थ्रेडिंग तुमच्यासाठीही घातक ठरू शकतं. थ्रेडिंग दरम्यान झालेली चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते. डॉ. अदितिज धमीजा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि सांगितलं आहे की, त्यांच्या एका रुग्णाला थ्रेडिंग करणं कसं महागात पडलं, तिचं लिव्हर फेल होण्याच्या मार्गावर होतं. डॉ. धमीजा यांनी सांगितलं की, पार्लरमधील लोकांची एक छोटीशी चूक एखाद्यासाठी घातक ठरू शकते.
थ्रेडिंग कसं ठरतं जीवघेणं?
डॉ. धमीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक २८ वर्षीय रुग्ण त्यांच्याकडे यायची, जिचं लिव्हर फेल होण्याच्या मार्गावर होतं. यामागील एक कारण म्हणजे थ्रेडिंग. खरं तर काही ब्युटी पार्लरमध्ये स्वच्छतेची अजिबात काळजी घेतली जात नाही. कधीकधी तोच धागा पुन्हा पुन्हा वापरला जातो.
डॉक्टरांचं म्हणणे आहे की, जेव्हा एकाच धाग्याचा वापर वेगवेगळ्या लोकांसाठी केला जातो तेव्हा आजारांचा धोका वाढतो. थ्रेडिंग करताना छोटे-छोटे कट होतात, जे दिसत नाहीत परंतु त्यामुळे हेपेटायटीस बी, सी आणि एचआयव्ही सारखे अनेक आजार देखील पसरू शकतात.
जेव्हा तुम्ही कोणत्याही पार्लरमध्ये जाता तेव्हा तिथल्या स्वच्छतेकडे नक्कीच लक्ष द्या. धागा काढताना प्रत्येक वेळी नवीन धागा वापरला जात आहे याची खात्री करा. अधिक सुरक्षिततेसाठी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्वतःचा वेगळा धागा घेऊन जाऊ शकता. पार्लर आणि सलूनसारख्या ठिकाणी धोकादायक आजारांचा प्रसार होऊ शकतो. म्हणून ते नेहमी काळजीपूर्वक निवडा. विशेषतः अशी जागा निवडा जिथे स्वच्छता असेल आणि नवीन उत्पादनं वापरली जातात.