Best Way to Take Face Steam: त्वचेची काळजी घेण्यासाठी महिला-तरूणी नेहमीच गरम पाण्याची वाफ घेतात. हा त्वचेसाठी वापरला जाणारा एक जुना फायदेशीर उपाय आहे. सर्दी-पडसा झाल्यावर सुद्धा वाफ घेतल्यास आराम मिळतो. गरम पाण्याची वाफ घेतल्यास चेहऱ्यावरील बंद पोअर्स उघडतात आणि त्वचा खोलवर स्वच्छ होते. मात्र, वाफ योग्य पद्धतीने घेतली तर त्याचे फायदे मिळतात. अनेक जण फक्त साध्या पाण्याची वाफ घेतात, पण स्किनकेअर तज्ज्ञांच्या मते पाण्यात दोन खास गोष्टी घालून वाफ घेतल्यास त्वचेची स्वच्छता तर होतेच, शिवाय रंगतही आतून उजळते. याबाबत स्किनकेअर एक्सपर्ट डॉ. मनोज दास यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओतून माहिती शेअर केली आहे. चला तर मग जाणून घेऊया योग्य पद्धत आणि फायदे...
वाफ घेण्याची योग्य पद्धत काय?
डॉ. मनोज दास सांगतात की, बहुतेक लोक फेस स्टीमसाठी म्हणजेच वाफ घेण्यासाठी फक्त साधं पाणी उकळतात आणि त्याची वाफ घेतात. पण जर त्यात हिवाळ्यात सहज मिळणाऱ्या काही नैसर्गिक गोष्टी घातल्या, तर फायदे अधिक वाढतात. म्हणजे एका पातेल्यात पाणी चांगले उकळा, पाणी उकळत असतानाच त्यात संत्र्याची साले आणि बीटाच्या पानांचे छोटे तुकडे घाला. नंतर गॅस बंद करा. डोक्यावर टॉवेल घेऊन सावधपणे वाफ घ्या.
फेस स्टीमचे फायदे
संत्र्याच्या साली आणि बीटाच्या पानांनी तयार केलेल्या पाण्याची वाफ घेतल्याने चेहऱ्यावरील बंद पोअर्स उघडतात. त्वचेला नैसर्गिक व्हिटामिन्स मिळतात. त्वचा लवकर उजळते आणि नॅचरल ग्लो मिळतो. या खास पाण्याने वाफ घेतल्यास ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, ज्यामुळे त्वचा अधिक हेल्दी आणि तजेलदार दिसते.
आठवड्यात किती वेळा घ्यावी फेस स्टीम?
स्किनकेअर एक्सपर्टनुसार, ही फेस स्टीम आठवड्यातून ३ वेळा घेऊ शकता. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल, तर वाफ घेण्यापूर्वी चेहऱ्यावर मॉइस्चरायझर लावणे फायदेशीर ठरते.
