सौंदर्यविषयक घरगुती उपायांमध्ये कॉफीचा फेसपॅक आजकाल खूप लोकप्रिय झाला आहे. कॉफी लावल्याने त्वचा उजळते, मृत पेशी निघून जातात आणि चेहरा ताजातवाना दिसतो. हा उपाय वर्षानुवर्षे केला जातच आहे. (Should you apply coffee to your face? read before using coffee products)खरं तर, कॉफीमध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स त्वचेसाठी उपयुक्त ठरतात, पण प्रत्येकासाठी हा उपाय योग्यच असेल असे नाही. त्वचेचा पोत पाहून उपाय करावेत.
कॉफीचा फेसपॅक त्वचेवरील मृत पेशी काढण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि त्वचेवर तेज आणण्यास मदत करतो. पण प्रश्न असा आहे की कोणतीही कॉफी त्वचेवर लावावी का? उत्तर स्पष्ट आहे की 'नाही'. अनेक प्रकारच्या कॉफी मिळतात. मात्र फेसपॅकसाठी नेहमी साधी, शुद्ध आणि बिना-साखरेची कॉफी पावडर वापरावी. तयार ड्रिंक मिक्स, इन्स्टंट कॉफी किंवा फ्लेवर्ड कॉफीमध्ये रसायने, साखर आणि सुगंधी पदार्थ असतात, जे त्वचेवर लावल्यास पुरळ येऊ शकते. त्यामुळे नैसर्गिक आणि कडू कॉफीच योग्य ठरते.
संवेदनशील (Sensitive) किंवा कोरडी त्वचा असणाऱ्यांनी कॉफीचा फेसपॅक टाळावा. कॉफी थोडीशी आम्लीय (acidic) असल्याने अशा त्वचेवर लालसरपणा किंवा कोरडेपणा वाढू शकतो. तसेच ज्यांना त्वचेवर आधीच पिंपल्स, अॅलर्जी, किंवा एक्झिमा आहे त्यांनी हा उपाय अजिबात करु नये. अशा स्थितीत कॉफीतील कॅफीन त्वचेला अधिक उत्तेजित करुन त्रास वाढवू शकते. त्यामुळे त्वचा निस्तेज होते.
कॉफीचा फेसपॅक वापरण्यापूर्वी हाताच्या आतल्या भागावर थोडा लावून टेस्ट करा. काही वेळ हातावर ठेवा त्याचा परिणाम पाहा मगच तो पॅक चेहर्यासाठी वापरा. फेसपॅक जास्त वेळ ठेवू नये आणि नेहमी सौम्यपणे धुवून त्वचेला मॉइश्चरायझर लावावे.
कॉफीचा फेसपॅक काही लोकांसाठी प्रभावी ठरु शकतो, पण सर्वांसाठी सुरक्षित नाही. योग्य प्रकारची कॉफी, योग्य प्रमाण आणि त्वचेचा पोत ओळखूनच वापर करणे गरजेचे आहे. चुकीचा वापर केल्यास सौंदर्य वाढवण्याऐवजी त्वचेचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी काळजी घेणे गरजेचे आहे.