गुलाब हे केवळ सुंदर फुल नसून त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे. जुन्या काळापासून गुलाबाचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी केला जातो. गुलाबामधील थंडावा, सौम्य सुगंध आणि पोषणद्रव्ये त्वचेला ताजेतवाने, कोमल आणि उजळ करण्यासाठी मदत करतात. योग्य पद्धतीने वापर केल्यास गुलाब त्वचेचे अनेक प्रश्न नैसर्गिकरित्या कमी करु शकतो. गुलाबाचा त्वचेसाठी वापर अनेक प्रकारे करता येतो. (Rose is not only beautif but also medicine for the skin, use it like this and you will look as beautiful as a rose)सर्वात सोपा आणि लोकप्रिय वापर म्हणजे गुलाबपाणी. गुलाबपाणी नैसर्गिक टोनर म्हणून काम करते. चेहरा धुतल्यानंतर कापसाने गुलाबपाणी लावल्यास त्वचेचा पीएच बॅलन्स राखला जातो, पोअर्स स्वच्छ होतात आणि त्वचेला ताजेपणा मिळतो. उन्हामुळे होणारी आग, लालसरपणा आणि थकलेली त्वचा शांत करण्यासाठी गुलाबपाणी खूप फायदेशीर ठरते.
घरीच गुलाबपाणी तयार करायचे असल्यास ताज्या, सुगंधी गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. त्या पाण्यात घालून मंद आचेवर उकळवा. पाकळ्यांचा रंग पाण्यात उतरला की गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यावर गाळून काचेच्या बाटलीत साठवा. हे गुलाबपाणी फ्रिजमध्ये ठेवून काही दिवस वापरता येते.
त्वचेसाठी गुलाबाचा आणखी एक प्रभावी उपयोग म्हणजे गुलाब फेस पॅक. कोरड्या त्वचेसाठी गुलाबपाणी आणि मध एकत्र करुन पेस्ट तयार करता येते. ही पेस्ट चेहऱ्यावर १५–२० मिनिटे लावून नंतर धुतल्यास त्वचा मऊ आणि चमकदार होते. तेलकट त्वचेसाठी गुलाबपाणी आणि मुलतानी माती यांचे मिश्रण उपयोगी ठरते. यामुळे अतिरिक्त तेल नियंत्रणात राहते आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होते. गुलाबाच्या पाकळ्यांचा स्क्रबही घरी तयार करता येतो. वाळवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या बारीक करुन त्यात थोडेसे साखर किंवा ओट्स आणि गुलाबपाणी मिसळून सौम्य स्क्रब तयार करता येतो. हा स्क्रब त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो आणि त्वचेला नैसर्गिक तेज देतो.
पोषणाच्या दृष्टीने गुलाब त्वचेसाठी अतिशय समृद्ध आहे. गुलाबामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट्स असतात. हे घटक त्वचेचे नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात, त्वचेचा उजळपणा वाढवतात आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. गुलाबातील नैसर्गिक तेल त्वचेला ओलावा देऊन कोरडेपणा कमी करते. तसेच त्याचे अँटी बॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला संसर्गापासून वाचवतात. नियमितपणे आणि योग्य पद्धतीने गुलाबाचा वापर केल्यास त्वचा निरोगी, कोमल आणि तजेलदार राहते. केमिकलयुक्त उत्पादकांऐवजी गुलाबासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर केल्यास त्वचेला सौंदर्याबरोबरच पोषणही मिळते.
