पायांवरील केस काढण्यासाठी रेझरचा वापर हा सोपा आणि झटपट उपाय आहे. काही सेकंदांत त्वचा मऊ - स्वच्छ दिसू लागते, पण काही दिवसांनी त्या त्वचेवर छोटे काळे ठिपके दिसतात. याला 'स्ट्रॉबेरी लेग्ज' असे म्हणतात, कारण त्वचा स्ट्रॉबेरीसारखी दाणेदार दिसायला लागते. लहान छिद्रांमध्ये काळसर ठिपके असतात. (Removing leg hair with a razor gives you strange strawberry legs, see what to do )ही समस्या दिसायला किरकोळ वाटली तरी तिच्यामागे त्वचेच्या आरोग्याशी निगडीत त्रास आहेत.
रेझर वापरताना त्वचेचा वरचा संरक्षक थर हलक्या प्रमाणात निघून जातो. त्याचवेळी त्वचेतील रोमछिद्रं उघडी राहतात आणि त्यात धूळ, तेल, मृत पेशी किंवा बॅक्टेरिया सहज शिरतात. हे मिश्रण छिद्रांमध्ये अडकून ऑक्सिजनच्या संपर्कात आलं की काळं पडतं आणि त्वचेवर ब्लॅकहेड्ससारखे ठिपके दिसू लागतात. हीच प्रक्रिया स्ट्रॉबेरी लेग्जचे मुख्य कारण आहे. कधी कधी रेझरचे ब्लेड जुनं, बोथट किंवा अस्वच्छ असते. त्यामुळे शेव्हिंग करताना त्वचेवर सूक्ष्म जखमा होतात. या जखमांमुळे त्वचेला खाज सुटते आणि बॅक्टेरिया वाढल्यास पुरळ येऊ शकते. वारंवार शेव्हिंग केल्यामुळे त्वचा कोरडी होते, तिचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि ती आणखीन संवेदनशील होते.
स्ट्रॉबेरी लेग्ज टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्वचेला पुरेसं पोषण आणि ओलावा देणं. पायांचीही चेहऱ्याइतकी काळजी घेतली तर त्वचा मऊ, स्वच्छ आणि उजळ दिसते. योग्य स्वच्छता, सौम्य उत्पादने आणि नियमित काळजी घेतली तर रेझरमुळे होणारे स्ट्रॉबेरी लेग्ज आणि ब्लॅकहेड्स सहज टाळता येतात. रेझर वापरण्याऐवजी नैसर्गिक वॅक्सिंग तसेच आजकाल मिळणाऱ्या आयुर्वेदिक पावडर तज्ज्ञांच्या मदतीने वापरा. त्यामुळे त्वचा सुंदर राहते आणि केसही काढता येतात.
रेझर जरी पटकन वापरता येत असला तरी त्याचे परिणाम दिर्घकाळ राहतात. घाई असताना कधीतरी वापरा मात्र नेहमीच्या वापरासाठी काय करावे यासाठी तज्ज्ञांचा सल्लाच घ्या. स्ट्रॉबेरी लेग्ज लगेच नजरेस पडतात. दिसतातही विचित्र त्यामुळे वेळीच उपाय करा.
