पिंपल्स आले की अनेक जण चुकून किंवा सवयीने ते फोडतात. ते फोडल्यावर जरी तात्पुरते बरे वाटले तरी नंतर त्याचे परिणाम त्वचेवर दीर्घकाळ राहतात. पिंपल्स फोडल्यामुळे जखम होते, सूज वाढते आणि त्या जागी हळूहळू काळसर किंवा तपकिरी डाग तयार होतात. (Pimples will go away, but what about blemishes? they make your face look dull , very simple solutions will be useful)हे डाग पटकन जात नाहीत, उलट वेळेनुसार गडद होत जातात आणि चेहर्याचे सौंदर्य कमी झाल्यासारखे वाटते. मात्र योग्य काळजी आणि घरगुती उपाय नियमितपणे केल्यास हे डाग नक्कीच हलके करता येतात.
पिंपल्स फोडल्यावर डाग का पडतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. पिंपल फोडल्यामुळे त्वचेखालील संसर्ग खोलवर पसरतो. त्यामुळे त्या जागी जास्त प्रमाणात मेलॅनिन तयार होते. हेच मेलॅनिन पुढे काळ्या डागांच्या स्वरुपात दिसू लागते. शिवाय जखम बरी होत असताना त्वचा नीट भरुन येत नाही, त्यामुळे डाग अधिक ठळक दिसतात.
हे डाग कमी करण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपल्स फोडण्याची सवय थांबवणे. नवीन पिंपल्स आल्यावर त्यांना हात लावू नये, वारंवार आरशात पाहून नखाने ते ओढू नयेत. त्वचा जितकी शांत ठेवली जाईल, तितक्या लवकर ती बरी होते. त्यामुळे अजिबात काही करु नका.
घरगुती उपायांमध्ये कोरफड हा अतिशय प्रभावी उपाय मानला जातो. कोरफड त्वचेचा दाह कमी करते, जखम भरून काढण्यास मदत करते आणि डाग हलके करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी पिंपलच्या डागांवर ताजे कोरफड जेल लावून ठेवले, तर काही आठवड्यांत फरक जाणवतो.
हळद आणि दही यांचा लेपही डागांसाठी उपयुक्त ठरतो. हळदीत अँटीसेप्टिक गुणधर्म असतात आणि दही त्वचेला पोषण देते. आठवड्यातून दोनदा हा लेप लावल्यास डाग हळूहळू फिके पडू लागतात. मात्र हळद फार कमी प्रमाणात वापरावी, नाहीतर त्वचा पिवळी दिसू शकते.
लिंबाचा रस हा नैसर्गिक ब्लीचसारखा काम करतो, त्यामुळे काळे डाग कमी करण्यासाठी तो वापरला जातो. पण लिंबाचा रस थेट लावण्याऐवजी त्यात थोडेसे मध मिसळून वापरणे अधिक सुरक्षित ठरते. मध त्वचेला ओलावा देतो आणि लिंबाची तीव्रता कमी करतो. हा उपाय आठवड्यातून एक-दोन वेळाच करावा. पण जर त्वचा फार संवेदनशील असेल तर लिंबू वापरणे टाळा.
बेसन, चंदन आणि गुलाबपाणी यांचा लेप त्वचेचा रंग समतोल ठेवण्यास मदत करतो. हा लेप त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो आणि नव्या त्वचेची वाढ सुधारतो. नियमित वापरामुळे डाग कमी होऊन त्वचा स्वच्छ आणि तजेलदार दिसू लागते.
डाग कमी करण्यासाठी आहार आणि जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची आहे. भरपूर पाणी पिणे, हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये खाणे यामुळे त्वचा आतून सुधारते. झोप पूर्ण न झाल्यास किंवा सतत ताणतणाव असल्यास डाग लवकर जात नाहीत. त्यामुळे पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैली आवश्यक आहे.
सूर्यप्रकाशात जाताना सनस्क्रीन वापरणे खूप गरजेचे आहे. पिंपल्सचे डाग उन्हात अधिक गडद होतात. त्यामुळे बाहेर पडताना त्वचा झाकणे किंवा योग्य सनस्क्रीन लावणे हा डाग वाढू न देण्याचा महत्त्वाचा उपाय आहे.
