हळदी कुंकवाच्या (Haldi Kumkum) सणानिमित्त महिलांची लगबग सुरू होते. या विशेष प्रसंगी चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा तुम्ही घरी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून फेशियल करू शकता. पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च न करता तुम्ही घरच्याघरी सोप्या पद्धतीनं फेशियल करू शकता. फेशियल करण्याच्या सोप्या स्टेप्स पाहूया. (5 Easy Steps To Do Facial At Home)
क्लिंझिंग
फेशियलची सुरूवात चेहरा स्वच्छ करण्यापासून होते.. त्यासाठी कच्चं दूध वापरा, कापसाचा गोळा कच्च्या दुधात भिजवून त्यानं चेहरा आणि मान पुसून घ्या. यामुळे चेहऱ्यावरील धूल आणि घाण निघून जाते. २ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्यानं धुवा.
स्क्रबिंग
त्वचेवरील मृत पेशी काढण्यासाठी स्क्रबिंग महत्वाचे आहे. तांदळाचे पीठ आणि दही किंवा साखर आणि मध हे मिश्रण चेहऱ्याला लावून ५ मिनिटं वर्तुळाकार मसाज करा. यामुळे त्वचा मऊ होते आणि ब्लॅकहेड्स निघण्यास मदत होते.
स्टिमिंग
गरम पाण्याची वाफ ५ ते ७ मिनिटं चेहऱ्यावर घ्या. यामुळे त्वचेची छिद्र उघडतात आणि त्वचा खोलवर स्वच्छ होते. वाफ घेऊन झाल्यावर चेहरा स्वच्छ रुमालाने पुसून घ्या.
फेशियल मसाज
रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मसाज आवश्यक आहे. कोरफड जेल लावून किवा मध लावून चेहऱ्याला मसाज करा. जेल किंवा मध लावून चेहऱ्यावर खालून वरच्या दिशेनं १० मिनिटं मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक उजळपणा येतो.
फेस पॅक
बेसन, चिमूटभर हळद आणि गुलाब पाणी हे मिश्रण चेहऱ्याला लावून १५ ते २० मिनिटं ठेवा. पॅक सुकल्यानंतर थंड पाण्यानं चेहरा धुवा. याऐवजी तुम्ही विकत मिळणारे फेस पॅकही लावू शकता. फक्त तुमच्या त्वचेला सुट होईल असा फेस पॅक निवडा.
फेशियल करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या. फेशियल केल्यानंतर लगेच साबण वापरू नका. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या एक दिवस आधीच फेशियल केल्यास कार्यक्रमाच्या दिवशी चेहऱ्यावर छान ग्लो येईल. चेहऱ्याचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी तुम्ही डी टॅनचे पॅक लावून नंतर घरात फेशियल करू शकता. यामुळे पैश्यांची बचत होईल आणि चेहर्यावर ग्लो येईल.
