Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोज खा पापड, व्हा धडधाकट! बेसन आणि सातूच्या पिठाचे पौष्टिक पापड, तब्येत राहील उत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 13:58 IST

सुदृढ राहाण्यासाठी पापड खा! यंदाच्या वाळवणात करा बेसन आणि सातूच्या पिठाचे चविष्ट आणि पौष्टिक पापड..

ठळक मुद्देपापडाचा संबंध केवळ चवीशी नसतो तर आरोग्याशी देखील असतो. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी बेसन सातूचे पापड अवश्य खावेत. हे पापड रोज खाल्ले तर याचा फायदाच होतो. बेसन-सातूच्या पापडांनी शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळते आणि मूडही सुधारतो. 

जेवणाचा मेनू साधा असू देत किंवा स्पेशल सोबत कुरकुरीत पापड असले की जेवणास मजा येतेच. केवळ जेवणासोबतच नाहीतर मधल्या भुकेसाठी कुरकुरीत खाऊ म्हणून पापड उपयोगी पडतात. म्हणूनच उन्हाळ्यात आवर्जून वडे, पापड, कुरडया केल्या जातात. घरी करायला जमलं नाही तर बाहेरुन आणून वाळवणाच्या साहित्यांनी डबे भरले जातात. कुरकुरीत आणि खमग चवीच्या पदार्थासाठीची धावपळ ही कोण्याही भारतीय स्त्रीसाठी नवीन नाही. नवीन काही असेल तर ते आहेत वाळवणाचे नवनवीन  प्रकार. बटाटा-साबुदाण्याचे, तांदळाचे, गव्हाचे, नागलीचे, मुगा उडदाचे पापड केले जातात. पापड करताना त्याच्या खमंग चवीचा आणि तो भाजला आणि तळल्यानंतर  मस्त फुलून येण्याबाबतीतलाच विचार जास्त केला जातो. पापडाचा संबंध केवळ चवीशी नसतो तर आरोग्याशी देखील असतो. म्हणूनच वाळवणात पौष्टिक पापडांची देखील सोय करुन ठेवायला हवी.

Image: Google

वजनाच्या  बाबतीत जागरुक असणाऱ्यांनी तर पौष्टिक आणि आरोग्यदायी पापडांची बेगमी तर अवश्य करायला हवी. यासाठी वाळवणात बेसन आणि सातूच्या पिठाचे पापड आवर्जून करायला हवेत. बेसन आणि सातूच्या पिठाचे पापड वर्षभर पुरतील एवढे करुन ठेवण्याची गरज नाही. हे इन्स्टंट पापड असतात. ज्या दिवशी खायचे त्याच दिवशी बनवले तर चालतात. हे पापड केल्यानंतर दोन्ही बाजूंनी घरातल्या घरात वाळवून घेऊज लगेच खाता येतात. 

बेसन आणि सातूच्या पिठाचे पापड

बेसन आणि सातूच्या पिठाचे पापड करण्यासाठी अर्धा कप सातूचं पीठ, 1 कप ऑलिव्ह ऑइल, दीड चमचा मीठ, पाव चमचा आल्याची पेस्ट, चिमूटभर हळद, दीड चमचा लाल तिखट, पाव चमचा बेसन आणि पाव चमचा लसणाची पेस्ट घ्यावी. 

Image: Google

एका मोठ्या भांड्यात बेसन पीठ, सातूचं पीठ, लाल तिखट, लसूण पेस्ट, आल्याची पेस्ट, हळद आणि मीठ घ्यावं. सर्व साहित्य नीट एकत्र करावं. पिठात पाणी घालून पीठ मऊसर मळून घ्यावं. पीठ मऊ होईपर्यंत चांगलं मळावं. ते थोडा वेळ सेट होवू द्यावं.  नेहमीप्रमाणे पापड करुन ते घरातल्या घरात दोन्ही बाजूंनी वाळवून घ्यावेत. हे पापड भाजून/ तळून किंवा बेक करुनही छान लागतात. 

Image: Google

बेसनाचे पापड खाण्याचे फायदे

1.पापड कोणत्याही प्रकारचे असू देत त्यात कॅलरीजचं प्रमाण कमीच असतं. बेसनाचे पापडही याला अपवाद नाही. बेसनाच्या पापडामधील बेसन पीठ आणि सातूचं पीठ आरोग्यासाठी फायदेशीर असतं. 

2. बेसन आणि सातूच्या पिठानं शरीरात ऊर्जा निर्माण होते. बेसनाच्या पापडात प्रथिनांचं प्रमाणही चांगलं असतं. बेसन-सातूच्या पिठाचे पापड खाल्ल्याने इन्स्टंट ऊर्जा मिळते. हे पापड खाल्ल्याने मूडही छान होतो.]

3. 'एनल्स ऑफ न्यूट्रिशन ॲण्ड मेटाॅब्लिजम' या मासिकात प्रकाशित झालेला एक अभ्यास सांगतो की बेसनाच्या पदार्थांच्या  ( कोणत्याही) सेवनानं गव्हाच्या तुलनेत एकूण 3.9 टक्के कोलेस्टेराॅल तर 4.6 टक्के बॅड कोलेस्टेराॅल कमी होतं. बेसन सातूचे पापड खाल्ल्यानं कोलेस्टेराॅलही नियंत्रणात राहातं.

 

टॅग्स :अन्नआहार योजनाकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती