ड्राय स्किन म्हणजेच कोरडी त्वचा लोकांना त्रास किंवा कंडीशन वाटते मात्र मुळात तो त्वचेचा प्रकार आहे. काहींची त्वचा मुळात कोरडी असते. त्यामुळे काहीही केलं की वातावरणाचा त्यावर परिणाम होतोच. काळजी घेणे मात्र आपल्या हातात आहे. (Dry skin means constant itching and red rashes, take care of dry skin like this - avoid serious diseases)हवामानातील बदल, थंड वारे, जास्त वेळ एसीत बसणे, गरम पाण्याने अंघोळ करणे किंवा चुकीची स्किनकेअर उत्पादने वापरणे यामुळे त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी झाली की ती ताणल्यासारखी वाटते, खाज सुटते, पांढऱ्या रेघा दिसतात आणि कधी कधी चिरा देखील पडतात. म्हणूनच ड्राय स्किनची योग्य वेळी काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.
सर्वात आधी लक्षात ठेवा की त्वचेला ओलावा मिळणे गरजेचे आहे. अंघोळीनंतर त्वचा हलकी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावणे हा उत्तम उपाय आहे. यामुळे त्वचेत ओलावा लॉक होतो. जाडसर आणि क्रीम बेस असलेले मॉइश्चरायझर ड्राय स्किनसाठी चांगले ठरतात. दिवसातून किमान दोनदा तरी मॉइश्चरायझर वापरण्याची सवय लावा. झोपताना तूप लावा. त्वचेला ओलावा मिळतो आणि पोषणही.
पाणी पिणे ही सगळ्यात सोपी पण दुर्लक्षित सवय आहे. शरीरात पाण्याची कमतरता असेल तर त्याचा परिणाम त्वचेवर लगेच दिसतो. त्यामुळे दिवसातून पुरेसे पाणी प्या. आहारात तूप, सुकामेवा, बिया यांसारखे हेल्दी फॅट्स असलेले पदार्थ ठेवल्यास त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. तसेच दिवसाला किती पाणी पिता याचा अंदाज घ्या. किती पाणी पिणे गरजेचे आहे समजून घ्या. दिवसाला तेवढे पाणी प्यायलाच हवे.
अंघोळ करताना खूप गरम पाणी वापरणे टाळा. गरम पाणी छान वाटते अंघोळ करायला मजा येते. त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकते आणि त्वचा आणखी कोरडी होते. सौम्य, साबणरहित क्लेन्झर वापरणे फायदेशीर ठरते. आठवड्यातून एकदाच सौम्य स्क्रब वापरा, वारंवार स्क्रब केल्याने त्वचा अधिक सेंसिटिव्ह होऊ शकते.
आता कोणत्या सवयी टाळायला हव्यात ते पाहूया. वारंवार फेस वॉश करणे टाळा. दिवसातून दोन वेळा पुरेसे असते. सतत नवीन प्रॉडक्ट्स ट्राय करणेही टाळा, कारण त्यातील रसायने त्वचेला सूट झाली नाहीत तर कोरडेपणा वाढू शकतो. एसी किंवा हीटरसमोर जास्त वेळ बसत असाल तर त्वचेवर नियमितपणे मॉइश्चरायझर लावा.
तसेच त्वचा कोरडी असताना ती खाजवल्यास किंवा जोरात घासल्यास त्वचेचे नुकसान होऊ शकते. टॉवेलने चेहरा पुसताना हलक्या हाताने टिपून पुसावा. ड्राय स्किन ही मोठी समस्या नाही, पण दुर्लक्ष केल्यास ती त्रासदायक ठरु शकते. नियमित काळजी, योग्य आहार आणि योग्य सवयी यामुळे त्वचा मऊ, नितळ आणि निरोगी राहू शकते.
