आजकाल अनेक महिला चेहऱ्यावरचे अनावश्यक केस काढण्यासाठी फेशिअल थ्रेडिंग आणि वॅक्सिंग या पद्धतींचा वापर करतात. आयब्रोसाठी थ्रेडिंग ही पद्धत सुरक्षित आणि प्रभावी मानली जाते, वर्षानुवर्षे थ्रेडिंग केले जात आहे. पण तीच पद्धत गाल, हनुवटी, कपाळ किंवा संपूर्ण चेहऱ्यावर वापरणे खरंच योग्य आहे का? याबद्दल अनेकांच्या मनात शंका असते. (Do you remove facial hair by threading or waxing? See what's better and why you look old, with wrinkles on your face)कारण चेहऱ्याची त्वचा ही शरीरातील इतर भागांच्या तुलनेत खूपच नाजूक आणि संवेदनशील असते.
थ्रेडिंगमध्ये सूती धाग्याच्या मदतीने केस मुळासकट काढले जातात. आयब्रो भागाची त्वचा तुलनेने घट्ट असल्यामुळे तिथे थ्रेडिंग सहन होते. मात्र गाल, हनुवटी आणि कपाळाची त्वचा पातळ आणि मऊ असते. या भागांवर थ्रेडिंग केल्यास त्वचेवर ताण पडतो. वारंवार थ्रेडिंग केल्याने त्वचा लाल होणे, दाह होणे, सूज येणे तसेच सूक्ष्म जखमा होण्याची शक्यता वाढते. काही महिलांमध्ये यामुळे पिग्मेंटेशन म्हणजेच काळे डागही दिसू लागतात.
फेशिअल वॅक्सिंगमध्ये गरम किंवा कोमट वॅक्स त्वचेवर लावून केस काढले जातात. या प्रक्रियेमुळे केस काही काळासाठी पूर्णपणे निघून जातात आणि चेहरा मऊ आणि स्वच्छ दिसतो. मात्र वॅक्सिंगमुळे त्वचेचा नैसर्गिक तेलकट थर निघून जातो. गाल आणि कपाळावर वारंवार वॅक्सिंग केल्यास त्वचा कोरडी, ताणलेली आणि संवेदनशील होते. काही वेळा गरम वॅक्समुळे त्वचा भाजल्यासारखी होणे, पुरळ येणे किंवा अॅलर्जी होण्याचा धोका असतो. त्यामुळे वॅक्सिंग करताना काळजी घ्या. चेहऱ्यावर असे प्रकार करणे टाळा.
हनुवटी आणि ओठांवर केस जाड असतील तर थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग केल्यानंतर त्या भागात इनग्रोन हेअर्स, लालसरपणा आणि खाज येऊ शकते. विशेषतः हार्मोनल बदल असलेल्या महिलांमध्ये या समस्या अधिक दिसतात. सतत केस मुळासकट काढल्यामुळे त्वचेखाली सूज निर्माण होऊन पुढे पिंपल्स किंवा फॉलिक्युलायटिस होऊ शकतो.
थ्रेडिंग आणि वॅक्सिंगचा आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे त्वचेवर सुरकुत्या येणे. चेहर्यावर सतत ताण पडल्यामुळे त्वचेतील कोलेजन आणि इलास्टिन तंतू कमकुवत होतात. परिणामी, हळूहळू त्वचा सैल पडणे, बारीक सुरकुत्या दिसणे आणि अर्ली एजिंगची लक्षणे दिसू लागतात.
मग काय करावे, हा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. चेहऱ्यावरील केस फार बारीक आणि कमी असतील तर त्यांना तसंच सोडणे हाच उत्तम पर्याय असतो. फारच गरज असल्यास फेशिअल रेजर, ट्रिमर किंवा डर्मॅटोलॉजिस्टच्या सल्ल्याने सुरक्षित पद्धती वापराव्यात. केस काढल्यानंतर त्वचेला शांत करणारे जेल, अॅलोवेरा किंवा मॉइश्चरायझर लावणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे फेशिअल थ्रेडिंग करत असाल तर वेळीच सावध व्हा.
