Tomato Benefits for Skin in Summer : घरातील लहान असो वा मोठे जवळपास सगळ्यांनाच टोमॅटो किंवा टोमॅटोची भाजी आवडते. वेगवेगळे पदार्थ आणि भाज्यांमध्येही टोमॅटो किंवा त्याच्या पेस्टचा वापर केला जातो. पण अनेकांना अजूनही टोमॅटोचे त्वचेला होणारे फायदे माहीत नसतात. टोमॅटोमध्ये असलेल्या लायकोपीन तत्वामुळे त्वचेला वेगवेगळे फायदे होतात. खासकरून उन्हाळ्यात टोमॅटोचे वेगवेगळे फेसपॅक वापरून तुम्ही त्वचेची योग्य ती काळजी घेऊ शकता. बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा उन्हाळ्यात हे नैसर्गिक आणि घरगुती उपाय केल्यास अधिक फायदा मिळू शकतो.
उन्हाळ्यात त्वचेला टोमॅटोचे फायदे
उन्हाळ्यात तापमान वाढल्यानं सूर्याच्या प्रखर किरणांमुळे त्वचेचं चांगलंच नुकसान होतं. अशात या दिवसांमध्ये नियमितपणे टोमॅटो खाल्ल्यानं आणि टोमॅटोचा त्वचेवर वापर केल्यानं त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. टोमॅटोपासून तुम्ही वेगवेगळे फेसपॅकही तयार करू शकता. ज्यानं सनप्रोटेक्शन होतं. तसेच यातील ल्यूटिन चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्यासही मदत करतं.
टोमॅटो आणि लिंबाचा रस
त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटोचा गर लिंबाच्या रसात मिश्रित करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडं झाल्यावर चेहरा पाण्याचे धुाव. याचा उन्हाळ्यात रोज वापर केल्याने त्वचेवरील टॅनिंग दूर होईल. तसेच त्वचेवर ग्लो सुद्धा येईल.
टोमॅटो, दही आणि लिंबू
टोमॅटो, दही आणि लिंबाचा रस त्वचेवर नैसर्गिक ब्लीचच्या रूपात काम करतो. याने त्वचेवरील रोमछिद्रे स्वच्छ केली जातात आणि अतिरिक्त तेलही दूर केलं जातं. लिंबू ब्लीच आणि अॅंटी-बॅक्टेरिअल तत्वासारखं काम करतं. तर दह्याने त्वचेला ओलावा मिळतो, ज्यामुळे त्वचेचा रखरखीतपणा दूर होतो.
टोमॅटो, मध आणि बेसन
चेहरा चमकदार आणि मुलायम करण्यासाठी हा फेसपॅक फायदेशीर ठरतो. टोमॅटो, मध, बेसन आणि पुदीन्याच्या पानांची पेस्ट तयार करा. त्यात तुम्ही काकडीही टाकू शकता. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटांनी चेहरा धुवा.