Holi Stubborn Color Remedies: पक्क्या रंगांनी होळी खेळण्याची आपली एक वेगळीच मजा असते. पण खरी समस्या तेव्हा होते जेव्हा रंग खेळून झाल्यावर हात आणि चेहऱ्यावरील हा रंग लवकर निघत नाही. बऱ्याचदा पक्का रंग काढण्यासाठी लोक साबणाने त्वचा जोरजोरात घासू लागतात. ज्यामुळे त्वचेवर रॅशेस येतात आणि त्वचेची जळजळही होते. स्किन एक्सपर्ट सांगतात की, केमिकलयुक्त रंग काढण्यासाठी केमिकलचा वापर करणं टाळलं पाहिजे. त्याऐवजी आपल्या किचनमधीलच अनेक गोष्टींच्या मदतीने आपण रंग काढू शकता. अशात पाहूयात कोणत्याही वेदना किंवा त्रासाशिवाय पक्का रंग कसा काढाल.
मोहरीचं तेल आणि लिंबू
रंग खेळण्याआधी बरेच लोक त्वचेवर मोहरीचं तेल लावतात, पण जर रंग खेळून झाल्यावर रंग निघतच नसेल तर मोहरीचं तेल आणि लिंबाचं मिश्रण यात आपली मदत करेल. हे मिश्रण रंग असलेल्या ठिकाणी लावून हलकी मसाज करा. लिंबातील सिट्रीक अॅसिड ब्लीचिंग एजंटचं काम करतं आणि रंग चेहऱ्यावरून काढतं.
बेसन आणि दह्याचं उटणं
२ चमचे बेसनात थोडं दही आणि चिमुटभर हळद घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा, नंतर जेव्हा ही पेस्ट हलकी सुकेल तेव्हा त्वचा हलक्या हाताने घासा. याने रंग तर निघेलच, सोबतच उन्हात रंग खेळताना झालेली टॅनिंगही दूर होईल.
मुल्तानी माती - गुलाबजल
जर आपली त्वचा तेलकट असेल आणि रंग डागांसारखे जमा झाले असतील तर मुल्तानी मातीचा पॅक लावू शकता. ही माती गुलाबजलसोबत मिक्स करून लावल्याने रंग निघू लागतो. मुल्तानी मातीने त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये गेलेले रंग बाहेर काढते. हा पॅक लावताना काळजी घ्या की, तो चेहऱ्यावर पूर्णपणे कोरडा होऊ नये. कोरडा होण्याआधीच चेहरा धुवावा.
काकडीचा रस आणि मध
पक्का रंग अनेकदा त्वचेला रखरखीत आणि निर्जीव करतो. अशात काकडीचा रस काढून त्यात थोडं मध मिक्स करा. हे मिश्रण रूईच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. ही उपाय अशा लोकांसाठी फार फायदेशीर असेल ज्यांची त्वचा फार संवेदनशील आहे.
