Join us

मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 09:23 IST

1 / 12
Mumbai Mahapalika Election 2025 Politics: २०२४ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंना एकामागून एक धक्के बसत आहेत. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नेते, मंत्री पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. यातच आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मुंबई, ठाणे, पुणेसह राज्यभरातील महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
2 / 12
महाराष्ट्रातील 'मिनी विधानसभा' अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बहुप्रतिक्षित निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे महत्त्वाचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले. तसेच, चार आठवड्यांत निवडणुकीची अधिसूचना काढावी, असे बजावले. त्याचवेळी काही अडचण उद्भवल्यास आयोग वेळ वाढवून घेण्यासाठी न्यायालयाला विनंती करू शकतो, असेही निर्देश दिले. विशेष म्हणजे, २०२२ पूर्वीच्या ओबीसी आरक्षणानुसार या निवडणुका घ्याव्या, असे आदेश देत सध्या सुरू असलेल्या याचिकांवर जो काही निकाल येईल, तो निर्वाचित सर्व सदस्यांना लागू राहील, असेही न्यायालय म्हणाले.
3 / 12
एकीकडे सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी जोर लावलेला असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे मुंबई महापालिका राखणे अधिक आव्हानात्मक ठरू शकते, असे म्हटले जात आहे. पक्षाला लागलेली गळती ठाकरे गटाला थांबवण्यात यश येताना दिसत नाही. यातच ठाकरे गट मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याच्या मानसिकतेत आहे. यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंना चांगलाच जोर लावायला लागणार असल्याचे बोलले जात आहे.
4 / 12
उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेलेले पक्ष चिन्ह, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत पाडलेली मोठी फूट, त्याचबरोबर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मांडलेला वेगळा सवतासुभा. विधानसभेत उद्धवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासह विरोधी पक्षांचा झालेला दारुण पराभव. या पार्श्वभूमीवर होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. अशातच राज ठाकरे यांनी घातलेली साद आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळे मुंबई महापालिकेसाठी ठाकरे गट आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत.
5 / 12
सध्या राज्यात सत्तेत असलेली महायुती सर्वार्थाने भक्कम आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवरील भगवा फडकत ठेवण्यासाठी उद्धवसेनेला जिवाचे रान करावे लागणार आहे. उद्धवसेना आणि मनसे यांची युती झाली, तर राजकीय गणिते बदलू शकतात.
6 / 12
एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर आतापर्यंत उद्धवसेनेचे ३८ माजी (२०१७ आणि त्यापूर्वी पालिकेत पद भूषवलेले) नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. राजूल पटेल, राजू पेडणेकर, शीतल म्हात्रे, परमेश्वर कदम, संजय घाडी, मंगेश सातमकर, यशवंत जाधव, समाधान सरवणकर, अमेय घोले, समुद्धी काते असे तगडे नगरसेवक शिंदेसेनेत गेल्याने त्यांच्या जागेवर तोडीस तोड उमेदवार देणे उद्धवसेनेपुढे मोठे आव्हान आहे. या माजी नगरसेवकांना शिंदेसेनेकडून मोठी आर्थिक रसद मिळाल्याची चर्चा आहे.
7 / 12
मनसे आणि उद्धवसेनेत युती होण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. युती झालीच तर उद्धवसेनेला पालिकेतून हद्दपार करणे महायुतीला सोपे नसेल. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात का, ही बाब महत्त्वाची ठरू शकते.
8 / 12
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत किती ताकद आहे, याचाही फैसला या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. भाजप आणि उद्धवसेनेतील संघर्ष लक्षात घेता उद्धवसेनेला पालिकेतून हद्दपार करण्यासाठी भाजप सगळी ताकद पणाला लावणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
9 / 12
काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात फारशी पडझड झालेली नाही. मुळात या दोन्ही पक्षांची मुंबईत फारशी ताकद नाही. भाजपाने रवी राजा यांच्यासारखे ज्येष्ठ नगरसेवक आपल्याकडे खेचून घेतले आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील पोकळी अधिकच जाणवू लागली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत सत्तेत असला, तरी त्यांचीही मुंबईत फारशी ताकद नाही. तरीही महायुती म्हणून निवडणूक लढली गेल्यास महाविकास आघाडीला ते जड जाऊ शकते.
10 / 12
२०१७ साली निवडणूक झाल्यानंतर भाजपने शिवसेनेला बाहेरून पाठिंबा दिला होता. आम्ही चौकीदाराची भूमिका निभावू, असे सांगत त्यांनी पालिकेतील सत्तेत सहभागी होण्यास नकार दिला होता. त्याचवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने शिवसेनेला अप्रत्यक्ष पाठिंबा देत शिवसेनेची सत्ता टिकवून ठेवण्यास मदत केली होती. त्याचदरम्यान शिवसेनेने मनसेचे ७ पैकी सहा नगरसेवक आपल्याकडे खेचून सत्ता आणखी बळकट केली होती.
11 / 12
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर येत्या ऑक्टोबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणुका कधी घेणार ते राज्य निवडणूक आयोग येत्या ६ जूनपर्यंत जाहीर करेल. चार महिन्यांची मुदत सप्टेंबरपर्यंत संपेल. पण त्यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असतो. हे लक्षात घेता आयोग न्यायालयाला मुदतवाढीची विनंती करेल, असे मानले जात आहे.
12 / 12
तसेच २ ऑक्टोबरला दसरा आहे. दिवाळी २० ऑक्टोबरपासून सुरू होईल. या दरम्यानच्या १८ दिवसांत निवडणूक होईल, अशी शक्यता आहे. दिवाळीनंतरचे ठरले तर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात वा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाचवेळी होणार का ही उत्सुकता असेल.
टॅग्स :Mumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाElectionनिवडणूक 2024MNSमनसेMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसRaj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती