नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही, मग दाऊदकडे मांडायची का?; देवेंद्र भुयारांनी राऊतांना सुनावलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 12:51 PM2022-06-11T12:51:15+5:302022-06-11T13:02:39+5:30

संजय राऊतांच्या आरोपानंतर आता देवेंद्र भुयार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेला मतं दिली नाहीत, ज्यांनी शब्द देऊन दगाबाजी केली, त्यांची यादी आमच्याकडे आहे, असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यसभेच्या निकालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने काल जो घोडेबाजार केला, तो राज्यातील सर्व जनतेने पाहिला. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊतांच्या या आरोपानंतर आता देवेंद्र भुयार यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे. संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का? हे ब्रह्मदेवापेक्षा मोठे आहेत असं वाटायला लागलंय. मतदान गोपनीय राहतं, मी दिलं नाही हे यांना कसं माहिती?, असा सवाल देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केला आहे.

मी कुठलाही दगाफटका केलेला नाही. मी महाविकास आघाडीलाच मतदान केलं. माझी मुख्यमंत्र्यांवर नाराजी आहे पण माझी वयक्तिक नाराजी नाही. मुख्यमंत्र्यांवर जी नाराजी होती जी मी उघडपणे व्यक्त केली, नाराजी उद्धव ठाकरेंपुढे नाही तर काय दाऊदसमोर मांडायची का? असा सवालही देवेंद्र भुयार यांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत बेछूट बोलत आहे, जे योग्य नाही, याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांशी बोलणार आहे, अशी माहितीही देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.

दरम्यान, मला धक्का बसेल असा हा निकाल नाही. प्रत्येक उमेदवाराच्या मतांची संख्या बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या कोट्यामध्ये काही फरक पडलेला नाही. पण एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा पडले आहे आणि ते कुठून आले आहे.ते मला ठाऊक आहे. ते महाविकास आघाडीचे नाही, असे शरद पवार म्हणाले.

भाजपाने अपक्षांची जी मोट बांधण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी झाले आणि त्याचाच फरक पडला. चमत्कार झाला हे मान्य केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी विविध मार्गाने माणसं आपलीशी करण्याच्या गोष्टीमुळे त्यांना यश आलं आहे, असंही शरद पवार म्हणाले.