Sachin Vaze: ...अन् तिथेच मनसुखच्या हत्येचं संपूर्ण प्लानिंग झालं; वाझेंविरोधात NIAच्या हाती मोठा पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 09:14 PM2021-04-01T21:14:09+5:302021-04-01T21:17:17+5:30

Sachin Vaze: वाझेंनी वापरलेल्या सात गाड्या ताब्यात; आठव्या गाडीचा शोध सुरू

उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कार आढळून आली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे करत होते. त्यानंतर वेगानं घडामोडी घडल्या आणि काही दिवसांतच वाझेंना अटक केली.

स्फोटक प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलिसांकडे होता. मात्र त्यानंतर तो राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) हाती घेतला. त्यानंतर एनआयएला वाझेंविरोधात महत्त्वाचे पुरावे सापडले आणि त्यांचा पाय आणखी खोलात गेला.

२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार आढळून आली. त्यानंतर ५ मार्चला या कारचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात आढळून आला. आता या प्रकरणात एनआयएच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा लागला.

सचिन वाझेंनी स्फोटक आणि हिरेन हत्या प्रकरणात वापरलेल्या सात कार आतापर्यंत जप्त केल्या आहेत. आता एनआयए आठव्या कारच्या शोधात आहे. या कारबद्दलची महत्त्वाची माहिती एनआयएला मिळाली आहे.

एनआयए सध्या काळ्या रंगाच्या ऑडी कारच्या शोधात आहे. ही गाडी वसई भागात कुठेतरी असल्याची माहिती एनआयएला मिळाली. त्यानंतर एनआयएच्या पथकानं वसई आणि आसपासच्या भागात गाडीचा शोध सुरू केला आहे.

सचिन वाझेंनी वापरलेल्या काळ्या रंगाच्या ऑडी कारचं एक सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या हाती लागलं आहे. या कारमध्ये आपण सचिन वाझेंसोबत होतो, अशी माहिती निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदेनं दिली आहे. शिंदे संपूर्ण कटात वाझेंसोबत होता. तशी कबुली त्यानं एनआयएला दिली आहे.

एनआयएकडे असलेलं सीसीटीव्ही फुटेज फारसं स्पष्ट नाही. मात्र एनआयएकडे आता आणखी काही फुटेजेस असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विनायक शिंदेचा दावा खरा आहे का, ते पडताळून पाहण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत.

मनसुखच्या हत्येची योजना आखण्यासाठी सचिन वाझे आणि विनायक शिंदे भेटले होते. ते मुंबईच्या उपनगरी भागात गेले होते, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. एनआयएच्या हाती लागलेलं फुटेज वांद्रे-वरळी सीलिंकवरचं आहे.

ऑडीमध्ये विनायक शिंदे ड्रायव्हर सीटवर आहे आणि सचिन वाझे त्याच्या शेजारील सीटवर बसले होते. ही गाडी एनआयएसाठी खूप महत्वाची आहे. मात्र या गुन्ह्यात ही गाडी नेमकी कशी वापरली गेली हे अद्याप समजू शकलेलं नाही.

स्फोटक आणि हिरेन हत्या प्रकरणात एनआयएनं आतापर्यंत सात गाड्या जप्त केल्या आहेत. यात हिरवी स्कॉर्पिओ, पांढरी इनोव्हा, दोन काळ्या मर्सिडिज बेन्झ, लँड क्रूझर प्राडो, काळी वोल्वो आणि पांढऱ्या मित्सुबिशी आऊटलँडरचा समावेश आहे.