महाराष्ट्र फेब्रुवारीअखेर शंभर टक्के अनलॉक होणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले महत्वाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 11:57 AM2022-02-10T11:57:44+5:302022-02-10T12:03:30+5:30

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे आटोक्यात आला आहे. दररोजची रुग्ण संख्याही पाचशेहून कमी असल्याने मुंबईतील सर्व निर्बंध लवकरच शिथिल होणार आहेत.

पुढच्या आठवड्याभरात नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण होत आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत मुंबई शंभर टक्के अनलॉक होईल, असे संकेत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले.

मुंबईसह आता राज्यातील निर्बंधाबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. फेब्रुवारीअखेर नाट्यगृह, चित्रपटगृह 100 टक्के क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे. कारण कोरोना रुग्णसंख्या घटत चालल्यानं नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट्स फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने सुरु करण्याकडे कल राहिल, अशी माहिती स्वत: आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील निर्बंध पूर्णपणे हटणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असेल.

काही दिवसांपूर्वीच पालिकेने हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपटगृहं, नाटय़गृहं, थीम पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली होती. तर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये 50 टक्के उपस्थितीला परवानगी दिली आहे.

यासोबतच लग्नसमारंभासाठी 200 जणांच्या उपस्थितला परवानगी आहे. मात्र, रुग्णसंख्येत घट होत असल्यामुळं निर्बंध आणखी शिथिल करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु असल्याची माहिती मिळत आहे.