मुंबईत जो पक्ष अधिक जागा मिळवतो तो सत्तेत येतो? इतिहास काय सांगतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 12:45 PM2024-04-16T12:45:34+5:302024-04-16T13:01:59+5:30

Lok Sabha Elections 2024: देशाची आर्थिक राजधानी मुंबई महानगराने देशाचे वैचारिक नेतृत्व केले आहे.

मुंबई महानगराने देशाचे वैचारिक नेतृत्व केले आहे. देशभर चर्चेत राहिलेल्या चळवळीतील नेते, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत, साहित्यिक, औद्योगिक जगतातील नामांकित व्यक्ती मुंबईत राहतात.

सार्वत्रिक निवडणुकांत देशात असलेली भावना मुंबईकरांनी मतपेटीतून व्यक्त केली आहे, असे आजवरचे निकाल पाहिले तर दिसून येते. मुंबईत आताच्या घडीला सहा लोकसभा मतदारसंघ आहेत.

१९५२ साली देशात पहिली निवडणूक झाली. तेव्हापासून पुढे १९५७ आणि ६२ च्या निवडणुकांत मुंबईत चार लोकसभा मतदारसंघ होते. ६७ आणि ७१ या निवडणुकांत पाच मतदारसंघ होते. १९७७ पासून ही संख्या सहा झाली ती आजवर कायम आहे.

या सर्व निवडणुकांचा कल पाहिला तर मुंबईत जो पक्ष जास्तीत जास्त जागा मिळवतो तो देशात सत्तेवर आलेला किंवा सत्तेच्या बाजूला असलेला दिसतो. याला मोजकेच अपवाद आहेत.

१९५२ ते ७१ दरम्यान झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व दिसून येते. १९५२ साली काँग्रेसने मुंबईतील चारपैकी तीन जागा जिंकल्या होत्या, तर १९५७ मध्ये दोन, १९६२ मध्ये सर्व चार, १९६७ मध्ये पाचपैकी तीन आणि १९७१ मध्ये काँग्रेसच्या पाचही जागा निवडून आल्या होत्या.

१९७७ मध्ये काँग्रेसचा देशभर धुव्वा, मुंबईचीही साथ. १९८० ची निवडणूक मात्र अपवाद ठरली. तेव्हा काँग्रेसची मुंबईत केवळ एक जागा आली होती. १९८४ - इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरची निवडणूक. यावेळी काँग्रेसने सहापैकी चार जागा जिंकल्या होत्या.

१९८९ - देशभर काँग्रेसविरोधी वातावरण असताना मुंबईत पक्षाला दोन जागा मिळाल्या. १९९१ - राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतरची निवडणूक. यावेळी भाजप-शिवसेना आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी ३-३ जागा जिंकल्या.

१९९६ - अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील सरकार आले तेव्हा भाजप-सेना युतीने सर्व जागा जिंकल्या होत्या. १९९८ - संमिश्र कौल. भाजप-शिवसेना आणि काँग्रेसचे ३-३ खासदार लोकसभेवर गेले.

१९९९ - अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाला मुंबईकरांचा कौल. २००४ - भाजपाची इंडिया शायनिंग मोहीम फसली. २००९ - काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीला स्पष्ट कौल (काँग्रेसच्या सर्व ६ जागा आल्या).

२०१४ - देशभर काँग्रेसविरोधी वातावरण कोळसा घोटाळा याची चर्चा असताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आले. (भाजप-सेनेने सर्व सहा जागा जिंकल्या). २०१९ - भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत. २०१४ आणि २०१९ या दोन्हीही निवडणुकीत काँग्रेसची मुंबईत एकही जागा निवडून आली नाही.