'राष्ट्रवादीची सुनावणी, आव्हाडांच्या डोळ्यात पाणी; रोहित पवारांकडून संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 10:00 AM2023-10-07T10:00:03+5:302023-10-07T10:18:24+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा कोणाचा? यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे शरद पवार आणि अजित पवार गटांकडून जवळपास दोन तास जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरा कोणाचा? यावर शुक्रवारी निवडणूक आयोगापुढे शरद पवार आणि अजित पवार गटांकडून जवळपास दोन तास जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत चाललेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रीनंतर आयोगाने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता पुढील सुनावणी ठेवली आहे.

या सुनावणीनंतर राष्ट्रवादीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका मांडताना माझी निवड बेकायदेशीर असेल तर सर्वच आमदार बेकायदेशीर ठरतील, असे म्हटले. तसेच, भावनिक प्रतिक्रियाही दिली.

जयंत पाटील यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही भावनिक प्रतिक्रिया देत सुनावणीतील एक प्रसंग कथन केला आहे. आमदार रोहित पवार यांनीही या सुनावणीवर भाष्य करताना संताप व्यक्त करत बंडखोर आमदारांना थेट इशाराच दिलाय.

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना स्वत: निवडणूक आयोगामध्ये जाताना बघितलं. दुपारी 4 वाजता सुनावणी सुरु झाली संध्याकाळी 6 वाजता संपली. ते स्वत: तिथे बसून होते. त्यावेळेस त्यांच्या कानावरही शब्द आले, आमच्या कानावरही शब्द आले.

समोरच्या पक्षाकडील वकीलाने अत्यंत उद्धटपणाने ‘शरद पवार यांनी अध्यक्ष या नात्याने पक्ष चालवताना कधीच लोकशाही मूल्यांचे पालन केले नाही. एखाद्या हुकुमशहा सारखा पक्ष चालवला’ हे ते वारंवार बोलत होते. हे ऐकल्यानंतर मात्र डोळ्यात अश्रू उभे राहीले. की, ज्या माणसाने हे झाड लावलं, मोठं केलं; त्या माणसाला आज हे भोगावं लागत आहे.

ज्यांच्यामुळे साडेअठरा वर्षे सत्ता उपभोगली, आयुष्यात सगळं मिळालं त्यांनीच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल अशी निवेदनं वकिलामार्फत करायला लावणं हे दुर्देवं आहे, असा प्रसंग आव्हाड यांनी भावनिक शब्दात कथन केला आहे.

रोहित पवार यांनी म्हटले की, ज्या माणसाने पक्षाला आणि पर्यायाने नेत्यांना उभं केलं, ताकद दिली, आज त्याच स्वार्थी नेत्यांनी आपल्या उद्गात्याला निवडणूक आयोगाच्या दारात उभं केलं.

या स्वार्थी प्रवृत्तींनी आपला स्वाभिमान गहाण टाकला असला तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या ताकदीने आदरणीय पवार साहेबांसोबत आहेत आणि हीच साहेबांची खरी ताकद आहे.