Baba Bangali: लोकलमध्ये जाहिरातबाजी करणारा 'बंगाली बाबा' अखेर तुरुंगात; १५ हजार पोस्टर्सही जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 12:03 IST2026-02-19T11:55:25+5:302026-02-19T12:03:11+5:30

Baba Bangali Arrested: रेल्वे डब्यात स्टिकर चिटकविणाऱ्या बंगाली बाबाला अटक केल्याची घटना समोर आली आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संयुक्त आरपीएफ पथकाने रेल्वे डब्यात स्टिकर चिटकविणाऱ्या बंगाली बाबाला अटक केल्याची घटना समोर आली आहे.

रे रोड परिसरात मोहम्मद नझीर अंदारी नावाचा व्यक्ती 'बंगाली बाबा' म्हणून काम करत असल्याचं आरपीएफला समजलं होतं.

मिळालेल्या माहितीच्या आधारे दारूखाना येथील मीरा अली दर्गा येथे संयुक्त छापा टाकत मंगळवारी ही कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

बंगाली बाबाकडून सुमारे १५ हजार छापील पोस्टर्स जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपी असलेल्या मोहम्मदने रेल्वे प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता हे केल्याचं समोर आलं.

व्यावसायिक हेतूंसाठी रेल्वेचे डबे व परिसराचा वापर करून जाहिरात साहित्य चिकटवलं असल्याचं कबुली बंगाली बाबाने दिली आहे.

रेल्वे कायद्याच्या संबंधित कलमांखाली वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात बंगाली बाबाचे पोस्टर्स चिटकवलेले दिसतात.

पुढील तपासांत प्रचार साहित्य छापणं व चिकटविणं यामध्ये इतर व्यक्तींचाही सहभाग असल्याचं उघड झालं असून संबंधितांचा शोध सुरू आहे.

बंगाली बाबाचे पोस्टर्स तयार करणाऱ्या मुद्रण संस्थांशी संबंधित आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

मालमत्तेचे रेल्वे विद्रुपीकरण व अनधिकृत जाहिरात करणं हा दंडनीय गुन्हा आहे. नागरिकांनी रेल्वे किंवा गाड्यांमध्ये परिसरात परवानगीशिवाय पोस्टर्स अथवा सूचना लावू नयेत असं आवाहन करण्यात आलं आहे.