मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:09 IST2026-01-14T14:04:56+5:302026-01-14T14:09:50+5:30
Mumbai Municipal Corporation Election 2026: देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या मतदानासाठी आता अवघे काही तास उरले आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईतील पाच ज्वलंत मुद्द्यांचं भवितव्य निश्चित होणार आहे. हे मुद्दे कोणते याचा आपण आढावा घेऊयात.

देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवार १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या मतदानासाठी आता अवघे काही तास उरले आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत यावेळी भाजपा-शिंदे सेना महायुती विरुद्ध उद्धवसेना-मनसे- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशी मुख्य लढत होत आहे. या लढतीत मुंबईतील मराठी माणूस, मराठी अस्मिता, विकास, उद्योगांचं अदानींकडे झालेलं केंद्रिकरण हे मुद्दे चर्चेच राहिले होते. त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मुंबईतील पाच ज्वलंत मुद्द्यांचं भवितव्य निश्चित होणार आहे. हे मुद्दे कोणते याचा आपण आढावा घेऊयात.

मराठी अस्मिता
मुंबई महानरपालिका निवडणुकीमध्ये यावेळी मराठी अस्मितेचा मुद्दा प्रभावी राहिला आहे. तब्बल २० वर्षांनंतर मराठीच्या हितासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी भाजपा हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट आखत आहेत, असा दावा केला आहे. तसेच भाजपा हा महाराष्ट्रावर हिंदी भाषा लादत असल्याचा आणि परप्रांतियांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही ठाकरे बंधूंकडून करण्यात येत आहे. दरम्यान, भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीनेही मराठीचा मुद्दा विचारात घेतलेला आहे. तसेच मुंबईत मराठी माणसाला परत आणण्यापासून ते मुंबईत मराठी महापौर करण्यापर्यंतची आश्वासनं दिली आहेत. आता मुंबई महानगरपालिकेच्या निकालांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची कामगिरी चांगली झाली तर मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा राज्य पातळीवर प्रभावी होईल. तर मात्र भाजपाची सरशी झाली तर मराठी अस्मितेच्या मुद्द्याला धक्का बसू शकतो.

महायुतीच्या एकजुटीची परीक्षा
२०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षांनी दणदणीत विजय मिळवला होता. मात्र सध्या सुरू असलेल्या मनपा निवडणुकीमध्ये महायुतीमधील घटक पक्ष अनेक ठिकाणी स्वतंत्र लढत आहेत. मुंबईमध्ये भाजपा आणि शिंदेसेना यांच्यात युती झाली आहे. मात्र इथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष स्वबळावर लढत आहे. या निवडणुकीत भाजपा-शिंदेसेना यांच्या युतीमधील केवळ भाजपाची कामगिरी चांगली झाली आणि शिंदेसेना तुलनेने अयशस्वी ठरली तर महायुतीचं भवितव्य अधांतरी सापडेल. तसेच भाजपा भविष्यात एकट्याने वाटचाल करण्याचा विचार करू शकेल.

महाविकास आघाडीची अखेर
२०१९ साली नाट्यमय घडामोडी घडून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आकारास आली होती. मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ही महाविकास आघाडी मोडकळीस आलेली दिसत आहे. एकीकडे उद्धवसेना ही मनसे आणि शरद पवार यांच्या पक्षाला सोबत घेऊन लढत आहेत. तर काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन लढत आहे. आता या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती भक्कमपणे समोर आली तर प्रादेशिक अस्मिता असलेली नवी आघाडी उदयास येईल. तर काँग्रेस बॅकफूटवर जाऊन महाविकासा आघाडीचा शेवट होईल. उलट मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीने जोरदार कामहिरी केल्यास मुंबई आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये सेक्युलर-अल्पसंख्याक-दलित यांच्या राजकारणाला नवा आकार मिळेल. एकूणच मुंबई महानगपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीसाठी अस्तित्वाची लढाई आहे.

ठाकरे बंधूंच्या ऐक्याचं भवितव्य
मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज ठाकरे हे बंधू जुना वाद मिटवून एकत्र आल्याने मुंबईतील राजकीय समीकरणं बदलणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र दोन्ही भावांमध्ये २० वर्षांनंतर झालेलं मनोमीलन हे केवळ निवडणुकीपुरतं असल्याचा दावाही काही जण करताहेत. मात्र मुंबई महानगपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला यश मिळालं तर ही युती अधिक भक्कम होऊन महाराष्ट्रामध्येही एक नवी राजकीय ताकद म्हणून समोर येऊ शकते. मात्र अपयश आलं तर मात्र या युतीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. एवढंच नाही तर शिवसेनेत वर्चस्वाची लढाई सुरू झाल्यावर राज ठाकरे बाहेर पडले होते. त्यामुळे या निवडणुकीनंतरही दोन्ही भावांमध्ये पुन्हा जुने मतभेद उफाळू शकतात, असा दावाही काही जणांकडून केला जात आहे.

अदानी-अंबानी आणि परप्रांतियांचा मुद्दा
यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत परप्रांतीय आणि विशेष करून मुंबईवर होत असलेल्या गुजराती आक्रमणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजला. भाजपा मुंबई अदानींना आंदण देत असल्याचा आरोपही ठाकरेंकडून करण्याला आला. तसेच मुंबईतील परप्रांतियांविरोधातही त्यांनी आक्रमक भूमिका घेकवी होती. त्यामुळे मतदानावर मराठी विरुद्ध अमराठी या मुद्द्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडू शकतो. मात्र ठाकरे बंधूंकडून परप्रांतियांविरोधात घेण्यात आलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्याविरोधात अमराठी मतदारांचं एकत्रिकरण होऊन हा मुद्दा ठाकरे बंधूंच्या युतीवर उलटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र तरीही मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिका जिंकली तर मराठी अस्मिता पुन्हा एकदा धारदार होऊ शकते.

















