बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:08 IST2025-08-21T12:00:07+5:302025-08-21T12:08:51+5:30
BEST Election 2025 Result: अनेक वर्षांनी एकत्र येऊन ठाकरे बंधूंनी बेस्टची निवडणूक युतीत लढवली. परंतु, या पहिल्याच निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा धुव्वा उडाला. ठाकरेंच्या पराभवाची काही सांगितली जात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. बेस्ट पतपेढीतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना आणखी बळ मिळाले. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत केलेली युती ठाकरे बंधूंसाठी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची लिटमस टेस्ट मानली गेली. परंतु, बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा झालेला दारुण पराभव दोघांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ठाकरे बंधुंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना व मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला. २१ जागांपैकी कामगार नेते शशांक राव पॅनलचे १४ तर भाजपचे आ. प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. परंतु, या बेस्ट निवडणुकीतील हाराकिरीमुळे ठाकरे बंधूंचा पराभव नक्की का झाला, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये ठाकरेंच्या पराभवाची काही कारणे सांगितली जात आहेत.
ठाकरे गटाचा गाफीलपणा आणि निष्काळजीपणा यामुळे उत्कर्ष पॅनलचा दारुण पराभव झाल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलकडून लढवण्यात आलेल्या २१ जागांसाठी ७७ जणांकडून उमेदवारी अर्ज भरून घेण्यात आले होते. मात्र, यापैकी २१ जणांनाच संधी मिळाली. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घ्यावे लागलेले लोक नाराज झाले होते.
या नाराज उमेदवारांनी उत्कर्ष पॅनेलच्या विरोधात काम केल्याचीही चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाच्या बेस्ट कामगार सेनेला पॅनल तयार करताना अतिआत्मविश्वास नडला. तयारी न करताच ठाकरे बंधूंचे एकत्र पॅनल जाहीर करणे, शिंदे यांच्या शिवसेनेतील एका महिलेला उमेदवारी देणे, असे निर्णय घाईघाईत घेण्यात आले.
कामगार सेनेच्या विद्यमान संचालक मंडळावर गैरव्यवहाराचे आरोपांचा मुद्दा विरोधकांनी प्रचारात लावून धरला होता. शशांक राव यांनी बेस्टच्या कामगारांची रखडलेली देणी, ग्रॅच्युएटी आणि बेस्ट पतपेढीचा मनमानी कारभार यावरुन आंदोलनही केले होते. मात्र, ठाकरे गटाचे नेते गाफील राहिले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मतदार आपल्याकडे वळतील, असा फाजील आत्मविश्वास ठाकरे गटाच्या नेत्यांना होता. याचा मोठा फटका कामगार सेनेला बसला. बेस्टमध्ये मनसेच्या संघटनेची फारशी ताकद नाही. त्यामुळे या निवडणुकीत मनसेचे फक्त दोन उमेदवार होते.
बेस्ट उपक्रमात २०१९ मध्ये कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपातून पहिल्याच दिवशी शिवसेनेने माघार घेतली होती. त्याचा रोषही कर्मचाऱ्यांच्या मनात कायम होता. शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेत सुरू असलेला एककल्ली कारभार, उपक्रमातील संघटनेतील नेतृत्वात न झालेला बदल, मुंबई महापालिकेत अनेक वर्षे सत्तास्थानी असतानाही बेस्ट उपक्रमावर ओढवलेली हलाखीची स्थिती, निवृत्त कर्मचाऱ्यांची रखडलेली देणी आदींमुळे नाराजीचा स्फोट निकालातून दिसला.
उमेदवारी अर्जांच्या वेळी माघारीमुळे काही मंडळींनी उघडउघड, तर काहींनी छुप्या पद्धतीने बंडखोरी केली. त्याचा फटका निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलला बसला. नऊ वर्षांनी सोसायटीची निवडणूक घेण्यात आली. बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये २००६ पूर्वी शिवसेनेची सत्ता होती.
दिवंगत कामगार नेते शरद राव यांच्या दि बेस्ट वर्कर्स युनियनने २००६ मध्ये सोसायटीच्या निवडणुकीत विजय मिळविला आणि शिवसेनेला सत्ता गमवावी लागली. मात्र २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा सोसायटी काबीज केली होती. परंतु, यंदा झालेल्या बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलच्या पराभवाला कर्मचाऱ्यांची नाराजी कारणीभूत ठरली.
बेस्ट सोसायटीची निवडणूक ही कामगार क्षेत्रातील पहिली स्वतंत्र निवडणूक असून पक्षीय पाठिंबा न घेता आम्ही ७ जागांवर विजय मिळवला. ८ जागा अवघ्या ३० ते ४० मतांच्या फरकाने निसटल्या असून कमी फरकाने पराभूत झालेल्या जागांसाठी फेरमतमोजणी करण्याची मागणी आ. प्रसाद लाड यांनी केली आहे.
ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात, असे लिहून शिवसेना भवन परिसरात भाजपाने बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, रविंद्र चव्हाण आणि आशिष शेलार यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. त्यासोबतच या बॅनरवर उद्धव ठाकरेंचा एक फोटो पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपाने हा बॅनरद्वारे फक्त उद्धव ठाकरेंवर टीका केल्याचे पाहायला मिळत आहे.