Aryan Khan Arrest Updates: आर्यन खानच्या सुनावणीवेळी मानेशिंदेंच्या वक्तव्यानं भर कोर्टात हशा पिकला, नेमकं काय घडलं वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 06:37 PM2021-10-04T18:37:46+5:302021-10-04T18:48:44+5:30

Aryan Khan Arrest Updates: ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानसह तीन जणांच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान आज कोर्टात युक्तीवादात रंजक गोष्टी समोर आल्या आणि दोन्ही बाजूनं जोरदार युक्तीवाद केला गेला. नेमकं काय घडलं वाचा...

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला मुंबईत एका क्रूझवर ड्रग्ज पार्टीत एनसीबीनं केलेल्या छापेमारीत अटक करण्यात आली आहे. त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज एनसीबीनं आणखी काही पुराव्यांसह पुन्हा एकदा कोर्टात आर्यन खान आणि त्याच्यासह इतर अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली.

कोर्टानं दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आर्यनसह तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस कोठडीत वाढ करण्याच्या मागणीसाठी मुंबईतील किला कोर्टात आज सुनावणी झाली. यात आर्यन खानची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी याआधीच्या ड्रग्ज प्रकरणांचा दाखला देण्यास सुरुवात केली. यात रिया चक्रवर्ती आणि इतर काही प्रकरणांचा दाखला दिला. न्यायाधीश सांब्रे यांनी दिलेला निकाल त्यांनी वाचून दाखवला. त्यानंतर अलाहबाद हायकोर्टानं अशाच एका प्रकरणात दिलेल्या निकालाचाही त्यांनी दाखला दिला. यासर्व प्रकरणांमध्ये आरोपीला जामीन मिळाला होता हे त्यांनी कोर्टाच्या लक्षात आणून दिलं.

एनसीबीच्यावतीनं बाजू मांडणाऱ्या अनिल सिंह यांनीही याप्रकरणाची पाळंमुळं शोधून काढण्यासाठी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची गरज असल्याचा मुद्दा लावून धरला. प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं आणि गंभीर असून एका दिवसात याचा तपास करणं शक्य नाही, असा मुद्दा उपस्थित केला.

आरोपीनं केलेला गुन्हा अजामीनपात्र असल्यानं त्यांना जामीन दिला जाऊ नये अशी ठाम भूमिका सिंह यांनी मांडली. त्यावर मानेशिंदे लगेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.

मानेशिंदे यांनी पुन्हा एकदा आर्यन खानवर जरी अजामीनपात्र गुन्हा दाखल केलेला असला तरी तो जामीन मिळवण्यास पात्र आहे हे ठासून सांगितलं. मानेशिंदेंकडून वारंवार याचा उल्लेख केला जात असल्याचं पाहून कोर्टात उपस्थितांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मानेशिंदेंनी त्यांच्या आजच्या युक्तीवादातील आक्रमकपणावर मिश्किल भाष्य केलं.

"काय करु आज तुम्ही थेट अनिल सिंह यांना घेऊन आलात. काल मी दोन मिनिटांत माझा युक्तीवाद संपवला होता", असं मिश्लिकपणे म्हटलं. यावर कोर्टातील तणावाचं वातावरण काही निवळलं. पण थोड्यावेळानं सिंह आणि मानेशिंदे यांच्या युक्तीवादात पुन्हा एकदा खटके उडाले.

अनिल सिंह यांनी मानेशिंदेंनी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालाचा दाखला खोडून लावण्यास सुरुवात केली आणि आर्यन खानच्या मोबाइलच्या चॅट्सची कॉपी न्यायाधीशांना सादर केली.

न्यायाधीशांनी या चॅट्समधून तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे असं विचारलं असता सिंह यांनी ड्रग्ज प्रकरणाच्या मुळाशी जाऊन रॅकेटचा शोध घेण्याचा एनसीबीचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं. मानेशिंदेंनी त्यांच्या युक्तीवादात सुप्रीम कोर्टानं दिलेला निकाल दिलेल्या प्रकरणात एका कारमध्ये अमली पदार्थ सापडले होते असं म्हटलं. त्यावर सिंह यांनी मग काय झालं? इथं अमलीपदार्थ क्रूझवरुन जप्त करण्यात आले आहेत, असं म्हटलं.

त्यावर मानेशिंदे संतापले आणि संबंधित क्रूझ काही आर्यन खानच्या मालकीची नाही. असं असेल तर मग क्रूझवरील सर्व १ हजार जणांना अटक करायला हवी, असं विधान केलं. यावरुन अनिल सिंह आणि सतीश मानेशिंदे यांच्या खटके उडाले.

Read in English