येस बँक घोटाळा :राणा कपूरसह साथीदाराविरुद्ध हजार कोटींचा गैरव्यवहाराचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 14:15 IST2026-05-16T14:14:18+5:302026-05-16T14:15:26+5:30
एचडीआयएल समूहाशी संबंधित कंपनीच्या माजी संचालकाने येस बँक आणि सिक्युरिटी एआरसी कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात हजार कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा आरोप करत वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

येस बँक घोटाळा :राणा कपूरसह साथीदाराविरुद्ध हजार कोटींचा गैरव्यवहाराचा गुन्हा, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास
मुंबई : येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणानंतर बँकेचा तत्कालीन अध्यक्ष राणा कपूरसह त्याच्या साथीदारांचा आणखी एक हजार कोटींचा आर्थिक घोटाळा समोर आला आहे. एचडीआयएल समूहाशी संबंधित कंपनीच्या माजी संचालकाने येस बँक आणि सिक्युरिटी एआरसी कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात हजार कोटींच्या आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप करत वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी येस बँकेचे तत्कालीन संस्थापक, अध्यक्ष राणा कपूर, संबंधित बँक अधिकारी, तसेच सिक्युरिटी एआरसीचे संचालक सुधीर वालिया आणि इतर संबंधितांवर हा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
भांडुप येथील रहिवासी आणि सफायर लँड डेव्हलपमेंट प्रा. लि. कंपनीचे निलंबित संचालक लखमिन्दर दयाल सिंह यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१६ मध्ये कंपनीने येस बँकेकडून १५० कोटींची क्रेडिट सुविधा घेतली होती. या कर्जासाठी एचडीआयएल समूहाच्या विविध मालमत्ता आणि मॉल्स गहाण ठेवण्यात आले होते.
यात भांडुप येथील ड्रीम्स मॉल, गोरेगाव येथील हार्मनी मॉल, कांदिवली येथील ॲनेक्स मॉल, तसेच वसई येथील कुलराज ब्रॉडवे मल्टिप्लेक्ससह विरार, नाहूर आणि गोरेगावमधील विविध प्रकल्पांचा समावेश होता.
या कर्जाची परतफेड करण्यासाठी ३६ महिन्यांचा कालावधी असतानाही, येस बँकेने अवघ्या १० महिन्यांत संबंधित कर्ज सिक्युरिटी एआरसीकडे हस्तांतरित केले. यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पाळण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
२२.५० कोटी बँकेमार्फतच अप्रत्यक्षपणे उपलब्ध
सिक्युरिटी एआरसीला कर्ज हस्तांतरणासाठी आवश्यक असलेली १५ टक्के मार्जिन रक्कम म्हणजेच २२.५० कोटी ही रक्कम येस बँकेमार्फतच अप्रत्यक्षपणे उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. विविध समूह कंपन्यांच्या खात्यांमधून ही रक्कम वळवून अखेरीस ती सिक्युरिटी एआरसीच्या ट्रस्ट खात्यात जमा करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
कंपनीची कर्ज खाती ‘एनपीए’ घोषित न करता, तसेच मालमत्तांचे स्वतंत्र मूल्यमापन न करता, संगनमताने मालमत्ता हस्तांतरण करण्यात आले. त्यानंतर काही मालमत्तांची अल्प दरात विक्री करून कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान करण्यात आले. या संपूर्ण व्यवहारात कंपनीची अंदाजे हजार कोटींची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
तक्रारदाराचा दावा काय?
या प्रकरणाचा उल्लेख येस बँकेच्या २०१९ च्या स्पेशल ऑडिट रिपोर्टमध्येही असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. पोलिसांकडून तक्रारीची पडताळणी सुरू असून, पुढील तपासानंतर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.