मुंबई - मी आत्ताच ते पत्र पाहिले, ज्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. ज्यांना निवडून येण्याचं सोडा मात्र मते मिळण्याचा विश्वास नसतो तेच अशा गोष्टी करतात. याने काही फायदा होणार नाही. वरळीकर मतदार सूज्ञ आहेत, शिवसेना शिंदे गटाला असा कुठलाही पाठिंबा दिलेला नाही असं सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संतप्त भूमिका मांडली आहे. वरळीत शिवसेना शिंदे गटाकडून राज ठाकरेंच्या बनावट सहीचं पत्र व्हायरल केले जात आहे. त्यावरून मनसेने पोलीस स्टेशन आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
याबाबत राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही आमची निवडणूक लढवतोय. मतदारांनाही या गोष्टींवर विश्वास ठेवू नये. हे पत्र खोटे आहे. मी गुढीपाडव्याच्या सभेत सांगितले होते, निवडणुकीत खूप गोंधळ होतील. चित्रविचित्र गोष्टींचे वापर होतील त्याप्रमाणे ते होतायेत. अगोदरचे सत्ताधारी असतील किंवा आत्ताचे कुणालाच कुठल्या गोष्टींचा अंदाज येत नाही. असले प्रचार करून काही होणार नाही. जी काही माती खायची ती या भूलथापांना बळी पडणार नाहीत असं त्यांनी सांगितले.
तसेच पैशांचा वापर याआधी होत होता, मात्र सध्या खूप उघडपणे होतोय. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. लोकांनी मतदान केले पाहिजे ज्यांनी तुमच्या मतांची प्रतारणा केली, मतांचा अपमान केला त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे. लोकांचा विश्वास गमावला आहे त्यामुळे हल्ले वैगेरे होतायेत. दलबदलू प्रकाराचा राग एकमेकांवर निघतोय. मुद्द्यांना कुणी थारा देत नाही असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
वरळीतील प्रकार काय?
वरळी शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख राजेश कुसळे यांच्याविरोधात मनसेने तक्रार दिली आहे. राज ठाकरे यांच्या सहीच, मनसे लेटरहेडवरील बनावट पत्र व्हायरल केले. त्यात राज ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार यांना पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर मनसे आक्रमक झाली. या पत्राविरोधात पोलीस स्टेशन आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे परंतु या घटनेमुळे वरळीत मनसे आणि शिंदेंच्या कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी तणाव निर्माण झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.