ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 10:39 IST2025-08-19T10:37:05+5:302025-08-19T10:39:57+5:30
Mumbai Best Employee Election 2025: राजकीय गदारोळात कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला म्हणजे पुरे, असे म्हटले जात आहे.

ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
Mumbai Best Employee Election 2025: बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या २०२५-२०३० या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू बेस्ट कामगार सेना व मनसे बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवडणूक लढवित आहेत. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनल विरोधात भाजपकडून ५ संघटनांचे संयुक्त सहकार समृद्धी पॅनल मैदानात आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे ही निवडणूक चर्चेची झाली. यातच महायुतीकडूनही ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी पॅनल देण्यात आले. निवडणूक कुणीही जिंकले, तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित केले जात असल्याचे समजते.
उद्धवसेना व मनसे यांचे 'उत्कर्ष पॅनल' रिंगणात आहे. महायुतीकडून भाजप आ. प्रवीण दरेकर व आ. प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मंत्री नितेश राणे यांची 'समर्थ बेस्ट कामगार संघटना' आणि शिंदेसेनेचे माजी आमदार किरण पावसकर यांची 'राष्ट्रीय कर्मचारी सेना' एकत्र आल्या आहेत. त्यांनी 'सहकार समृद्धी पॅनल'ची निर्मिती केली आहे.
बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. सत्ताधारी पॅनेलविरोधात उभे ठाकलेल्या आ. प्रसाद लाड यांनी भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणल्याचा दावा केला आहे. तर, बेस्टच्या कर्मचाऱ्यांमध्ये घरे आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांना रोजगाराच्या हमीची चर्चा आहे. सोसायटीत जुने नेतृत्व टिकवायचे की नवे चेहरे आणायचे, यावरही चर्चा रंगत आहे. ही निवडणूक राजकारणापेक्षा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी असल्याचा दावा केला जात आहे. प्रचारात स्वस्त घरे, रोजगार निर्मिती यांसारखी आश्वासने दिली जात आहेत. पण, या गदारोळात कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला म्हणजे पुरे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, चार वर्षापासून रखडलेली बेस्ट पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत आहे. निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला यश मिळाले, तर महापालिका निवडणुकीत त्यांना लाभ मिळविता येईल. बेस्टच्या निवडणुकीत २१पैकी उद्धवसेना १९, तर मनसे २ जागा लढवणार आहे. त्यातच बेस्टच्या माझगाव येथील कर्मचारी बबिता पवार यांनी शिंदेसेनेतून ठाकरे बंधूंच्या पॅनलमध्ये प्रवेश केला.