भांडुप टँक रोड पालिका शाळेची नवी इमारत उभारणार कधी?; शिक्षण समितीकडून चौकशीचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:49 IST2026-04-28T12:49:33+5:302026-04-28T12:49:58+5:30
७ वर्षांपूर्वी पाडलेल्या शाळा परिसरात गर्दुल्ल्यांचा वावर

भांडुप टँक रोड पालिका शाळेची नवी इमारत उभारणार कधी?; शिक्षण समितीकडून चौकशीचे आदेश
मुंबई - भांडुपच्या टँक रोड शाळेची इमारत धोकादायक असल्याने सात वर्षांपूर्वी पाडण्यात आली. मात्र, अद्याप नवी इमारत उभारलेली नाही. याच परिसरात ‘एसआरए’कडूनही शाळेची इमारत बांधून तयार आहे. मात्र, ती देखील शाळा सुरू नाही. याबाबत पालिका शिक्षण समिती सदस्य प्रियांक राठोड यांच्या हरकतीनंतर अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी चौकशीचे आदेश दिले.
भांडुप पश्चिमेला असलेली टँक रोड पालिका शाळा २०१९ मध्ये धोकादायक म्हणून पाडण्यात आली. सात वर्षांनंतरही नवी इमारत उभी नाही. त्यामुळे जागेवर गर्दुल्ले व बेकायदेशीर कृत्यांचा वावर वाढल्याचे उबाठा गटाचे नगरसेवक शिक्षण समिती सदस्य प्रियांक राठोड यांनी निदर्शनास आणून देत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच तेथून ५ मिनिट अंतरावरच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून रहिवाशांसाठी एक इमारत बांधली गेली आहे.
टॅंक रोड शाळेतील विद्यार्थी संख्या
टँक रोड एमपीएस प्राथमिक शाळा १२२ विद्यार्थी
टँक रोड एमपीएस मा. शाळा २८ विद्यार्थी
टँक रोड हिंदी शाळा ४९ विद्यार्थी
एकूण विद्यार्थी १९९.
सविस्तर अहवाल सादर करा; शिक्षण विभागाला निर्देश
पालिका आणि एसआरए यांच्यातील दुर्लक्षामुळे ही देखील शाळा सुरू नसल्याचा आरोप प्रियांक राठोड यांनी केला. एसआरए शाळा हवेशीर नसल्याचाही आरोप राठोड यांनी केला. त्यामुळे शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवळकर यांनी शिक्षण उपायुक्त प्राची जांभेकर यांना याविषयी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
विद्यार्थ्यांची पायपीट, शिकविण्यात अडथळे
टँक रोड शाळेत जाऊ शकणारे १९९ विद्यार्थी सध्या भांडुप स्थानकाजवळच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शाळेमध्ये पायी चालत जातात. रहदारीमुळे शाळेत जाताना धोका संभवतो. याशिवाय या शाळेत आधीपासून १,७०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिकत आहेत. त्यामुळे शिकविण्यात अडथळे येत आहेत.