मतदार कार्ड नसले तरी करता येणार मतदान!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 01:27 PM2024-04-11T13:27:22+5:302024-04-11T13:28:34+5:30

आधार, पॅन कार्डसह १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार

Voting can be done even if there is no voter card in election of loksabha | मतदार कार्ड नसले तरी करता येणार मतदान!

मतदार कार्ड नसले तरी करता येणार मतदान!

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यांत होणार असून, १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांनी पुराव्यांमध्ये पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारे वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड  असे विविध १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जातील. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. 

    एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र, त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्त्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळेआधी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल.

Web Title: Voting can be done even if there is no voter card in election of loksabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.