महाराष्ट्रासारख्या राकट-कणखर मुलुखालाही नमवू, असे वाटत असेल तर ते ‘स्वप्नरंजन’च - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 07:57 AM2018-05-01T07:57:31+5:302018-05-01T07:57:31+5:30

महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला जागे होण्याचं आवाहन सामना संपादकीयमधून केले आहे.

Uddhav Thackeray's editorial on maharashtra day | महाराष्ट्रासारख्या राकट-कणखर मुलुखालाही नमवू, असे वाटत असेल तर ते ‘स्वप्नरंजन’च - उद्धव ठाकरे 

महाराष्ट्रासारख्या राकट-कणखर मुलुखालाही नमवू, असे वाटत असेल तर ते ‘स्वप्नरंजन’च - उद्धव ठाकरे 

Next

मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला जागे होण्याचं आवाहन सामना संपादकीयमधून केले आहे. सोबत काही मुद्यांवरुन भाजपावरही टीका केली आहे. ''महाराष्ट्राच्या निर्मितीला आज ५८ वर्षे होत आहेत. पण ज्या हेतूने संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आजच्या दिवशी महाराष्ट्रात आणला गेला, तो हेतू खरेच साध्य झाला काय? मंत्रालयातील खुर्च्यांवरची माणसे बदलल्याने महाराष्ट्र घडला काय? मऱ्हाटी राज्यात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या का करत आहेत? बेरोजगारी का वाढते आहे? राजकीय हत्याकांडांचे नवेच विष महाराष्ट्रात का फैलावते आहे? मराठी राज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांचे आत्मे ही अनागोंदी बघून नक्कीच तडफडत असतील. प्रश्न सोडवणार कोण? धोके अनेक आहेत. मराठी माणसा, जागा हो! महाराष्ट्राला तीच भक्कम एकजूट पुन्हा एकदा हवी आहे'', असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. 

- काय आहे आजचे सामना संपादकीय?
महाराष्ट्र आज ५८ वर्षांचा होत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा हा पवित्र दिवस आहे. १ मे १९६० रोजी १०७ हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र राज्य जन्माला आले तेही राजधानी ‘मुंबई’सह! सरकारी भाषेत ५८ चे वय हे ज्येष्ठांचे मानले जाते. ज्येष्ठांचा एक निराळा मान असतो. तो राखायलाच हवा. मात्र महाराष्ट्राचा हा मानमरातब खरोखरच राखला जातो आहे काय? अलीकडे राजकारणापासून सगळ्य़ाच क्षेत्रात ज्येष्ठांना दूर ठेवण्याचे किंवा बाजूला सारण्याचे ठरवून प्रयत्न होत असतात. ज्येष्ठांना निकाली काढण्याचे हे ‘गेम’ राजकारणात भलेही यशस्वी ठरत असतील; पण म्हणून महाराष्ट्रासारख्या राकट आणि कणखर मुलुखालाही आपण नमवू किंवा झुकवू असे कुणाला वाटत असेल तर ते केवळ ‘स्वप्नरंजन’च आहे, असे समजायला हवे. हे राज्य मराठी माणसाला सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. रक्ताचा नैवेद्य दाखवावा लागला. मूठभर ‘बेपाऱ्यां’च्या आर्थिक ताकदीवर मुंबई आणि महाराष्ट्राला गुलाम करण्याचे स्वप्न बघणाऱ्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्य़ाचा ज्वलज्जहाल इतिहास एकदा नीट वाचायला हवा. मुंबईवर गुजरातचा डोळा होता. देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबईसारखे महानगर गुजरातच्या घशात घालण्याचा तत्कालीन राज्यकर्त्यांचा डाव मराठी माणसांच्या भक्कम एकजुटीने उधळून लावला होता.

मुंबईतील गिरणी कामगारांनी आपल्या विराट शक्तीचे घडवलेले दर्शन आणि एकूणच मराठी जनतेने त्यावेळी जी वज्रमूठ आवळली होती त्यासमोर सगळे महाराष्ट्रद्रोही पालापाचोळ्य़ासारखे उडून गेले. हा इतिहास आहे. अर्थात, त्यासाठी मराठी माणसाला मोठा त्याग करावा लागला, रक्त सांडावे लागले. संघर्षाच्या अशा तेजस्वी लढ्य़ातून उदयास आलेल्या एका निखळ मराठी राज्याच्या स्थापनेचा हा दिवस आहे. हा दिवस बलिदानाचा आहे, त्यागाचा आहे, आनंदाचा आहे आणि मराठी माणसाच्या विजयाचा आहे. मराठी राज्य निर्मितीच्या या लढ्य़ात कामगारांचा सहभाग मोलाचा ठरला. त्यामुळे १ मेचा हा दिवस कामगार दिनाबरोबरच ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून दणक्यातच साजरा व्हायला हवा. तथापि, हा आनंद साजरा करीत असतानाच महाराष्ट्रासमोर असलेले धोके, येऊ घातलेली संकटे यांचाही विचार मराठीजनांनी केलाच पाहिजे. भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषकांचे मराठी राज्य निर्माण झाल्यानंतर आता पुन्हा महाराष्ट्रद्रोही शक्ती उचल खाऊ लागल्या आहेत. मराठी राज्याच्या अखंडत्वाला नख लावून एकाच मराठी भाषिक राज्याची शकले करण्याचे डावपेच आखले जात आहेत. महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शक्तींचा कावा वेळीच ओळखला नाही तर महाराष्ट्राचा घात होईल. जात, पात, धर्म आणि पंथ सारे काही बाजूला ठेवून केवळ मराठी राज्याचे शिलेदार म्हणून, मराठी माणूस म्हणून महाराष्ट्रापुढील संभाव्य संकटाला तोंड देण्यासाठी पुन्हा एकदा भक्कम एकजूट दाखवण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्य़ातील एक भळभळती जखम आजही बेळगावच्या रूपाने संवेदनशील मराठी माणसाला सदैव अस्वस्थ करीत असते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबईप्रमाणेच बेळगावचाही होता. मुंबई तर आपण मिळवली पण बेळगाव, निपाणी, कारवार, भालकीपर्यंतचा मराठी भाषिक सीमाभाग आजही कर्नाटकातच आहे. कानडी सरकारच्या जुलूम, अत्याचार आणि दडपशाहीविरुद्ध लढे देत तेथील मराठी भाषक सीमाबांधव कित्येक वर्षे रक्त सांडत आहेत, आज ना उद्या आपण महाराष्ट्रात सामील होऊ, या आशेने हे तमाम सीमाबांधव महाराष्ट्राकडे बघत आहेत. कानडी सरकार मराठी भाषक सीमाबांधवांवर जोरजबरदस्ती करत असताना महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी सीमाबांधवांच्या मदतीसाठी का धावून जाऊ नये? अर्थात मुंबईवरील मराठी ‘पकड’ कमी करण्याचे डावपेच आखणाऱयांकडून अशी अपेक्षा करणेही निरर्थकच आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीला आज ५८ वर्षे होत आहेत. पण ज्या हेतूने संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आजच्या दिवशी महाराष्ट्रात आणला गेला, तो हेतू खरेच साध्य झाला काय? मंत्रालयातील खुर्च्यांवरची माणसे बदलल्याने महाराष्ट्र घडला काय? मऱ्हाटी राज्यात दरवर्षी हजारो शेतकरी आत्महत्या का करत आहेत? बेरोजगारी का वाढते आहे? राजकीय हत्याकांडांचे नवेच विष महाराष्ट्रात का फैलावते आहे? मराठी राज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांचे आत्मे ही अनागोंदी बघून नक्कीच तडफडत असतील. प्रश्न सोडवणार कोण? धोके अनेक आहेत. मराठी माणसा जागा हो, महाराष्ट्राला तीच भक्कम एकजूट पुन्हा एकदा हवी आहे!

Web Title: Uddhav Thackeray's editorial on maharashtra day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.