एलएल.बी. प्रश्नपत्रिकेत चक्क दोन एकसारखे प्रश्न; दीड तासाने प्रशासनाने दिले नवे प्रश्न; विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 09:56 IST2026-05-05T09:56:08+5:302026-05-05T09:56:53+5:30

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात एलएल.बी. सत्र ४ परीक्षेचा ‘राज्यघटना २’ या विषयाची परीक्षा सोमवारी दुपारी २.३० वाजता सुरू झाली. या परीक्षेत प्रश्न २ मध्ये चौथा उपप्रश्न हा राज्यपालांची भूमिका आणि अधिकार याबाबत विचारण्यात आला होता.

Two identical questions in the LL.B. question paper; Administration gave new questions after an hour and a half; Students were confused | एलएल.बी. प्रश्नपत्रिकेत चक्क दोन एकसारखे प्रश्न; दीड तासाने प्रशासनाने दिले नवे प्रश्न; विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

एलएल.बी. प्रश्नपत्रिकेत चक्क दोन एकसारखे प्रश्न; दीड तासाने प्रशासनाने दिले नवे प्रश्न; विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

अमर शैला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या सोमवारी झालेल्या ३ वर्ष एलएल.बी. सत्र ४ परीक्षेत दोन प्रश्न एकसारखे दिल्याचा प्रकार घडला. ही चूक लक्षात आल्यावर विद्यापीठाने दीड तासाने या दोन प्रश्नांसाठी पर्यायी प्रश्न विद्यार्थ्यांना दिले. मात्र, तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या प्रश्नांची उत्तरे लिहिली होती. पण विद्यापीठाने पुन्हा नव्याने दिलेल्या प्रश्नांचीही उत्तरे लिहावी लागल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. 

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा सुरू आहेत. त्यात एलएल.बी. सत्र ४ परीक्षेचा ‘राज्यघटना २’ या विषयाची परीक्षा सोमवारी दुपारी २.३० वाजता सुरू झाली. या परीक्षेत प्रश्न २ मध्ये चौथा उपप्रश्न हा राज्यपालांची भूमिका आणि अधिकार याबाबत विचारण्यात आला होता. याच आशयाचा प्रश्न ४ मध्ये दुसरा उपप्रश्न होता. तर प्रश्न ३ मध्ये ३ रा उपप्रश्न हा आर्थिक आणीबाणीवर  होता. याच आर्थिक आणीबाणीच्या आशयाचा प्रश्न चारमध्ये ३ रा उपप्रश्न विचारण्यात आला होता.

काही विद्यार्थ्यांचा पेपर अपुरा

परीक्षेदरम्यान आधीच वेळेचे व्यवस्थापन करण्यात कसरत करावी लागते. आधीच प्रश्न सोडविले. मात्र बदललेले प्रश्न सोडवावे लागल्याने बराचसा वेळ या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यात गेला.

तसेच ऐनवेळी प्रश्न बदलल्याने ताण आला, अशी प्रतिक्रिया अन्य एका विद्यार्थ्याने दिली. विद्यापीठाने विद्यार्थ्यांना अर्धा तास वेळ वाढवून दिली. मात्र या गोंधळामुळे काही विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका पूर्ण सोडवून झाली नाही, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली.

प्रश्न पुन्हा सोडवावे लागले

विद्यापीठाने पर्यायी प्रश्न तब्बल दीड तासाने म्हणजे चार वाजता केंद्राला परीक्षा कळविले.  तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आधीचे प्रश्न सोडविले होते. पण नव्याने दिलेले प्रश्नही विद्यार्थ्यांना पुन्हा सोडवावे लागले, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली.

विद्यापीठाकडून अतिरिक्त वेळ

विद्यापीठाकडे याबाबत विचारणा केली असता विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अधिक वेळ दिला, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले.  मुंबई विद्यापीठाने परीक्षेला सुरुवात झाल्यावर १५ मिनिटे ते अर्ध्या तासाच्या आता प्रश्न बदलून देणे अपेक्षित आहे. तसेच प्रश्नपत्रिकेत या चुका करणाऱ्यांवर आणि प्रश्न बदलून देण्यास विलंब करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप विद्यार्थी कार्यकर्ता ॲड. सचिन पवार यांनी केली.

Web Title: Two identical questions in the LL.B. question paper; Administration gave new questions after an hour and a half; Students were confused