There is a need for an emotional unity with northeast India | ईशान्य भारताशी भावनिक ऐक्य साधणे गरजेचे
ईशान्य भारताशी भावनिक ऐक्य साधणे गरजेचे

मुंबई : सिक्किम, गंगटोकसारख्या पर्यटनस्थळांच्या पुढेही पूर्वोत्तर राज्यांचा पसारा आहे. या अतिदुर्गम भागात सामाजिक कार्य सुरू असले, तरी या भागाशी भावनिक ऐक्य साधण्यासाठी आणखी प्रयत्नांची आवश्यकता आहे. ईशान्य भारत आणि उर्वरित भारतातील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आणखी वृद्धिंगत करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बुधवारी केले.
सिक्किममध्ये नशामुक्तीसाठी कार्य करणाऱ्या आणि ‘लेपचा’ जमातीच्या शोषणाविरोधात लढणाºया सामाजिक कार्यकर्त्या छोडेन लेपचा यांना माय होम इंडियाचा ‘वन इंडिया’ पुरस्कार आज राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दादर येथील सावरकर स्मारक सभागृहात झालेल्या या सोहळ्यास राज्यपाल कोश्यारी, त्रिपुराचे माजी राज्यपाल पद्मश्री डी. वाय. पाटील, सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर, ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनिल देवधर आदी उपस्थित होते. माय होम इंडियाच्या कामाची प्रशंसा केली. छोडेन लेपचा यांनी अनाथ मुले आणि नशामुक्तीसाठी केलेल्या कामाचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.
छोडेन लेपचा यांनी हा पुरस्कार ‘लेपचा’ जमातीला समर्पित केला. परिस्थितीमुळे फार शिक्षण घेता आले नाही. सिक्किममधील एका छोट्याशा गावातून पहिल्यांदाच विमान प्रवास करत मुंबईत आले. इस्कॉन मंदिरात गेले. वाटेत अमिताभ बच्चन यांचा बंगलाही पाहिला. हे सारे स्वप्नवत वाटत आहे. मुंबई सुंदर आहे. मुंबईतून खूप मोठी जबाबदारी घेऊन गावाला जात असल्याचे सांगतानाच, यापेक्षा अधिक काम करण्याचे अभिवचनही छोडेन लेपचा यांनी या वेळी दिले.
पूर्वोत्तर राज्यांना उर्वरित भारताशी जोडून राष्ट्रीय एकात्मता साधण्याचे काम माय होम इंडिया करत असल्याचे सुनील देवधर यांनी या वेळी सांगितले. देशातील १२५ शहरांत १० हजारांहून कार्यकर्ते संस्थेशी जोडले गेले आहेत.
>राज्यपालांची धावपळ
सत्तास्थापनेवरून पेचप्रसंग निर्माण झाल्याने ‘राजभवन’ घडामोडींच्या केंद्रस्थानी आले आहे. या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवस सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करावे लागले. आज इथे येताना अर्ध्या वाटेतच माघारी फिरावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली होती, असे राज्यपाल म्हणाले. राज्यपालांनी थोडक्यात आपले भाषण आटोपून राजभवनाकडे धाव घेतली.

Web Title: There is a need for an emotional unity with northeast India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.