पावसामुळे तापमानात वाढ

By Admin | Updated: November 23, 2015 02:19 IST2015-11-23T02:19:58+5:302015-11-23T02:19:58+5:30

मुंबईसह आसपासच्या परिसरात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर येथील कमाल आणि किमान तापमानात किंचितशी वाढ झाली आहे.

Temperature increases due to rain | पावसामुळे तापमानात वाढ

पावसामुळे तापमानात वाढ

मुंबई : मुंबईसह आसपासच्या परिसरात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसानंतर येथील कमाल आणि किमान तापमानात किंचितशी वाढ झाली आहे. रविवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३५.५, २३.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. यापूर्वी ते ३२, १९ अंश सेल्सिअस एवढे होते. शिवाय रविवारी दुपारी काही काळ मुंबईवर मळभ पसरल्याने वातावरणात काहीसा उकाडा जाणवत होता.
अरबी समुद्रात पूर्व आणि दक्षिण दिशेला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. परिणामी, मुंबईसह आसपासच्या परिसरात शनिवारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आग्नेय व लगतच्या मध्य-पूर्व अरबी समुद्रावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारी मध्य-पूर्व अरबी समुद्रासह लगतच्या भागावर आहे. गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे.
मध्य महाराष्ट्राला देण्यात आलेला गारपिटीचा इशारा कायम आहे. २३ नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी गारपीट होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शिवाय २३, २४ नोव्हेंबर रोजी कोकण, गोवा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर विदर्भात हवामान कोरडे राहील. २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, असा
अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Temperature increases due to rain