A supporter of Deputy CM Ajit Pawar has gone to meet NCP President Sharad Pawar | पार्थ निर्णयाच्या तयारीत, अजित पवार समर्थक नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

पार्थ निर्णयाच्या तयारीत, अजित पवार समर्थक नेते शरद पवारांच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई: सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली. यानंतर आता पार्थ पवार कुटुंबाशी चर्चा करणार आहेत. पार्थ पवार आपले काका श्रीनिवास पवार, अभिजित पवार जयंत पवार तसंच सर्व आत्यांशी बोलून आपली भूमिका आणि निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र याच पार्श्वभूमीवर 'एबीपी माझा'च्या वृत्तानूसार, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे, आदित्य तटकरे, धनंजय मुंडे शरद पवारांची भेट घेण्यासाठी वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार यांनी फटकारल्यानंतर पार्थ पवार यांनी काल (13 ऑगस्ट) सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. परंतु यावेळी पार्थ आणि सुप्रिया सुळे यांच्यातच चर्चा झाली. मात्र शरद पवार आणि पार्थ यांची भेट झाली नसल्याचं कळतं. त्यानंतर आता कुटुंबातील इतर सदस्यांसोबत बोलण्याचा निर्णय पार्थ पवार यांनी घेतला आहे.

अजित पवार आणि पार्थ पवार हे पक्षात नाराज असल्याच्या चर्चेवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पडदा टाकला आहे. अजित पवार अथवा पार्थ पवार हे दोघेही नाराज नाहीत. यामुळे ते नाराज आहेत, असे मानण्याचा प्रश्नच येत नाही. पार्थ पवार कुठलाही निर्णय घेणार नाहीत. कुणीही नाराज होण्याचा प्रश्नच नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.

शरद पवार काय म्हणाले होते?

पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही."

अजित पवारांचे मौन कायम-

सिल्व्हर ओकवरील रात्रीच्या घडामोडीनंतर गुरुवारी दिवसभर पार्थ पवारच्या गोटात सामसूम होती. तर अजित पवारांनी देखील या विषयावील आपले मौन सोडले नाही. दिवसभराच्या बैठका आटोपून ते तडक पुण्याला निघून गेले.

पार्थच्या नव्या ट्विटची चर्चा-

पार्थने सकाळीच एक ट्विट करून, कोरोनाच्या लढ्यात आपण सगळे कष्ट करत आहोत, यातून चांगलेच काहीतरी निघेल. महाराष्ट्राचे हे स्पिरीट आहे. आपण हार मानत नाही अशा आशयाचे ट्विट केले. सोबत त्याने गणरायाची मूर्तीही जोडली होती. मात्र, त्या ट्विटमधील आपण हार मानत नाही या वाक्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: A supporter of Deputy CM Ajit Pawar has gone to meet NCP President Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.