आत्महत्या की मर्डर? कदम, साक्षीदार बनून खुलासा करणार होते; कंबोज यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 06:51 PM2023-03-29T18:51:46+5:302023-03-29T18:53:25+5:30

कदम यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Suicide or murder? Mohit Kamboj pointed fingers at former NCP ministers Jitendra Awhad | आत्महत्या की मर्डर? कदम, साक्षीदार बनून खुलासा करणार होते; कंबोज यांचा खळबळजनक दावा

आत्महत्या की मर्डर? कदम, साक्षीदार बनून खुलासा करणार होते; कंबोज यांचा खळबळजनक दावा

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांचे तत्कालीन अंगरक्षक वैभव कदम यांनी निळजे ते तळोजा दरम्यान उपनगरी रेल्वे खाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ९.०५ वाजताच्या सुमारास घडली. अभियंता अनंत करमुसे प्रकरणी ठाणे पोलिसांकडून त्यांची गेल्या काही दिवसापासून चौकशी सुरु होती. आता या आत्महत्या प्रकरणाचा ठाणे रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत ही आत्महत्या आहे की मर्डर असा सवाल केला आहे. 

कदम यांच्या आत्महत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. मात्र, मुबंई पोलिसांच्या विशेष सुरक्षा दलात (एसपीयू) मध्ये नेमणूकीला असलेल्या कदम यांचा आव्हाड यांच्या ठाण्यातील "नाद' बंगल्यावर करमुसे यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणात आरोपी म्हणून समावेश होता. यात अटक झाल्यानंतर त्यांची जामीनावर सुटकाही झाली. याच प्रकरणात गेल्या काही दिवसापासून ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरु होती. त्यामुळेही ते तणावाखाली असल्याचे बोलले जाते. आता, ही आत्महत्या आहे की हत्या, असा सवाल भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलाय. 

मोहित कंबोज यांनी ट्विट करुन याप्रकरणाच्या चौकशीची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 'हेडकॉन्स्टेबल वैभव शिवाजी कदम आज सकाळी मृतावस्थेत सापडले! महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट मंत्र्यांच्या संरक्षणासाठी ते काम करत होते आणि एका प्रकरणात आरोपी होते. एका हाय प्रोफाइल प्रकरणात वैभव कदम साक्षीदार होणार होते. इट इज अ क्लिअर कट मर्डर नॉट सुसाइड! मी एक्स्पोज करणार', असे ट्विट कंबोज यांनी केलंय. 

दरम्यान, कंबोज यांनी ट्विटरवरुन व्हिडिओ शेअर करत याप्रकरणाचा तपास करावा, एफआयआर दाखल करावी, अशी मागणी केलीय. हे प्रकरण आत्महत्या नसून हत्या आहे, मनसुख हिरने, सुशांतसिंग राजपूत प्रमाणेच हे प्रकरण असल्याचं कंबोज यांनी म्हटलंय. तसेच, वैभव कदम हे साक्षीदार बनून मोठा खुलासा करणार होते, म्हणून तर त्यांचा खून झाला नाही ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. 


 
रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या

बुधवारी सकाळी दिवा ते रोहा अशी जाणाऱ्या मेमो उपनगरी खाली निळजे ते तळोजा दरम्यान वैभव कदम यांनी स्वतःला झोकून दिले. घटनास्थळी त्यांचे शीर आणि हात धडावेगळे झाले. त्यांना तातडीने तशाच अवस्थेत दिवा येथील बालाजी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्याकडे मोबाईल आणि काही पैसे मिळाल्याचे ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.

आरोपी नसल्याचे स्टेट्स 

वैभव यांनी मृत्यू पूर्वी आपल्या मोबालवर एक स्टेट्स ठेवले आहे. पोलीस आणि मीडियाला विनंती आहे की, यात आपण आरोपी नाही, असा मजकूर यामध्ये आहे.

Web Title: Suicide or murder? Mohit Kamboj pointed fingers at former NCP ministers Jitendra Awhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.