Shiv Sena leader Sanjay Raut has revealed a case in the power sharing meeting | "'त्या' बैठकीत अजित पवार फोनवर चॅटिंग करत होते, त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला; अन्..."

"'त्या' बैठकीत अजित पवार फोनवर चॅटिंग करत होते, त्यानंतर त्यांचा फोन स्विच ऑफ झाला; अन्..."

मुंबई: महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सत्ताधारी व विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. याचदरम्यान आता महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यामागे महत्वाची भूमिका बजावलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सत्ता वाटपाच्या बैठकीतला एक किस्सा उघड केला आहे.

सामना'तील एका लेखातून त्यांनी महाविकास आघाडीच्या सत्तावाटपाच्या वेळी घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माझ्यात ३५ दिवस गाठीभेटी सुरु होत्या. मात्र आमच्या दोघांची गाठीभेटी म्हणजे निव्वळ टाईमपास आहे, असा अपप्रचार सुरु झाला. त्यानंतर आमच्याकडे १७० आमदारांचे पाठबळ आहे, असा दावा मी केला होता. मात्र या दाव्याची अनेकांनी खिल्ली देखील उडवली, असं संजय राऊत यांनी सांगितले. 

संजय राऊतांच्या नातेवाईकांनाही ईडीच्या नोटिसा; भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा

सरकार स्थापनेसंदर्भात काँगेसचा स्पष्ट होकार आला नव्हता. मात्र स्वर्गीय काँग्रेसचे अहमद पटेलांसारखे नेते सकारात्मक बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच होते. नेहरू सेंटरमधल्या २२ नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे व अन्य काही नेत्यांनी घेतली. खरगेंच्या या भूमिकेनंतर त्यांच्यात व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शरद पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल धावत गेलो. 

कंगना रणौत प्रकरण: महापालिकेची कारवाई बेकायदेशीर कशी?, हे मी शोधतोय; राऊतांची प्रतिक्रिया

बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे शरद पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला, असा खुलासा संजय राऊतांनी केला आहे. हे सगळं सुरु असताना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून ‘चॅटिंग’करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. अजित पवारांचा फोन त्यानंतर ‘स्विच ऑफ’झाला व दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी केलेलं 'ते' विधान ऑन रेकॉर्ड आहे; संजय राऊतांचं प्रत्युत्तर

महाविकास आघाडी व फडणवीस-अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत करण्यात आलेले अनेक दावे राऊत यांनी खोडून काढले आहेत. शरद पवार व माझी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर कधीही भेट वा चर्चा झाली नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणुकांचे निकाल ते शपथविधी हा ३७ दिवसांचा रोमांचक प्रवास होता. या सर्व दिवसांतील बहुतेक सर्व घडामोडींचा मी साक्षीदार आहे. महाराष्ट्राबरोबर यात दिल्लीच्याही घडामोडी आहेत. सरकार स्थापनेच्या नाट्याची खरी पटकथा अद्याप पडद्यामागेच आहे व राहील,' असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut has revealed a case in the power sharing meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.