राज्यभर चर्चा शरद पवार यांच्या लढवय्येपणाचीच !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 04:15 AM2019-10-25T04:15:05+5:302019-10-25T06:13:22+5:30

शरद पवार हे नाव वगळून राज्यातील कोणतीही निवडणूक लढता येत नाही, राजकीय गणित मांडता येत नाही, हेच पुन्हा एकदा या ८० वर्षांच्या तरुण नेत्याने तडफदारपणे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

Sharad Pawar's fighters talk all over the state! | राज्यभर चर्चा शरद पवार यांच्या लढवय्येपणाचीच !

राज्यभर चर्चा शरद पवार यांच्या लढवय्येपणाचीच !

googlenewsNext

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : शरद पवार हे नाव वगळून राज्यातील कोणतीही निवडणूक लढता येत नाही, राजकीय गणित मांडता येत नाही, हेच पुन्हा एकदा या ८० वर्षांच्या तरुण नेत्याने तडफदारपणे आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. विजय भाजप-शिवसेनेचा झाला आहे, पण राज्यभर चर्चा फक्त आणि फक्त शरद पवार यांच्या लढवय्येपणाची आहे. एकहाती स्वत:च्या पक्षाला आणि काँग्रेसला या नेत्याने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकून दिल्या आहेत. पवार यांना हात लावणे किती महागाचे ठरते, हे यानिमित्ताने उभ्या महाराष्ट्राने पाहिले. ‘टायगर अभी जिंदा है’ हेच या नेत्याने दाखवून दिले.

पवार यांच्या लढाईची खरी सुरुवात झाली ती साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशानंतर. पवारांनी साताºयात काढलेल्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तरुणांची मोठी फौज रस्त्यावर उतरली. तेव्हा पवारांचा बंदोबस्त केला पाहिजे असे संदेश वरपर्यंत गेले. त्यावर मंथन होत असतानाच नाशिकला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत उदयनराजे यांना दूर बसवले, असे म्हणत त्यांना भाजपने दिलेल्या वागणुकीवरून सोशल मीडियात युद्ध रंगले. तर ‘राजे, तुमचं चुकलं...’ असे साताराकरांनी सांगायला सुरुवात केली.

पवारांवर बंधने घातली पाहिजेत यावर भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर एकमत होत होते. त्यातूनच राज्य सहकारी बँकेचे प्रकरण समोर आले आणि पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल झाला. मुरलेल्या पवारांनी आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तीत केले. गुन्हा दाखल होताच त्यांनी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाण्याची भूमिका जाहीर केली. आपण तिकडे जाऊ; पण कोणीही ईडीच्या कार्यालयाकडे येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. या आवाहनाचा अर्थ त्यांच्या कार्यकर्त्यांनी जो घ्यायचा तो घेतला. राज्यभरातून तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे मुंबईच्या दिशेने निघाले व निवडणुकीच्या हवापालटाची सुरुवात झाली. हे लक्षात येताच सूत्रे हलली. पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाऊ नये अशी विनंती मुंबई पोलीस आयुक्तांनी केली. हे घडत असताना राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देणे सुरूच होते. ‘मेगाभरती’ असे त्याला नाव दिले गेले.

सुशिक्षित बेरोजगारांची मेगाभरती असते हे माहिती होते; पण राजकारण्यांची मेगाभरती पहिल्यांदाच पाहतो आहे, असे पवार मध्येच बोलून गेले. त्या एका घटनेने तरुणांना आणखी चेतवण्याचे काम केले. दिसत नसले तरी या सगळ्या घटनाक्रमाचे परिणाम जनतेवर होत होते. पवारांना एकटे पाडले जात आहे, रडीचा डाव खेळला जात आहे, या भावनेने तरुणांच्या मनात घर करणे सुरू झाले होते.

ग्रामीण महाराष्ट्रात गेली ५० वर्षे त्यांना ओळखणाऱ्यांना या घटनेची चीड आल्याचे गावोगावी फिरताना दिसत होते. या सगळ्या घटनाक्रमामुळे पवार यांच्याविषयी सहानुभूती निर्माण होत होती. जे शरद पवार कोणत्याही सहकारी बँकेचे संचालकच नाहीत, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होत असेल तर छोट्यामोठ्या चुका व्यवहारात होत असतात, त्यावरून आपले काय होईल, या भीतीने छोट्या व मध्यमवर्गाच्या मनात घर करणे सुरू केले. यात भर पडली ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची. विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवारांचे राजकारण संपलेले दिसेल असे विधान त्यांनी केले. भाजपचा हा अतिआत्मविश्वासही लोकांना पटला नाही. सगळ्यांनाच गृहीत धरले जात आहे हे पाहून लोक अस्वस्थ असल्याचे निवडणूक दौºयात फिरताना दिसत होते.

पवारनाट्याची सुरुवात ज्या साताºयातून झाली त्याच साताºयात प्रचाराचा नाट्यमय समारोप घडला. धो धो पावसात भाषण करणारे शरद पवार यांनी लोकांच्या थेट काळजाला हात घातला. अत्यंत कमी काळात ती क्लिप राज्यभर प्रचंड वेगाने व्हायरल झाली. पावसात ओलेचिंब झालेले पवार प्रचंड आत्मविश्वासाने बोलत होते तेव्हा स्टेजवरचे सगळे नेते उभे राहून तो प्रसंग पाहत होते. समोर पहेलवानच नाही, असे सांगणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भर पावसात पवार म्हणत होते... मी तर पहेलवान संघटनेचा अध्यक्ष आहे..! वातावरण बदलले आणि गेली ५० वर्षे पवारांना पाहात आलेल्या महाराष्ट्राने ८० वर्षांच्या या तरुण नेत्याला मनोमन साथ दिली. जेथे दोन्ही काँग्रेसना विरोधी पक्ष पद मिळविण्याएवढेही बहुमत मिळणार नाही असे सांगितले जात होते तेथे पवारांनी राष्ट्रवादीसोबत काँग्रेसलाही जीवदान दिले आहे. एका सिनेमातील गीत या नेत्याला तंतोतंत लागू होते...

यहाँ के हम सिकंदर..!
चाहें तो रख ले सबको अपनी जेब के अन्दर,
हमसे बचके रहना मेरे यार..!
नहीं समझे है वो हमें, तो क्या जाता है
हारी बाजी को जीतना हमें आता है...

Web Title: Sharad Pawar's fighters talk all over the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.