रिक्षा-टॅक्सीचालकांची ‘दादागिरी’ सुरूच

By Admin | Updated: August 2, 2014 02:00 IST2014-08-02T02:00:04+5:302014-08-02T02:00:04+5:30

मुजोर रिक्षा-टॅक्सीचालकांची शहर आणि उपनगरात ‘दादागिरी’ सुरूच असून, वाहतूक पोलिसांकडून अशा चालकांविरोधात कारवाई केली जात आहे.

Rickshaw-taxi drivers 'dadagiri' started | रिक्षा-टॅक्सीचालकांची ‘दादागिरी’ सुरूच

रिक्षा-टॅक्सीचालकांची ‘दादागिरी’ सुरूच

अंधेरी : मुजोर रिक्षा-टॅक्सीचालकांची शहर आणि उपनगरात ‘दादागिरी’ सुरूच असून, वाहतूक पोलिसांकडून अशा चालकांविरोधात कारवाई केली जात आहे. मात्र कारवाई करूनही पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशीच परिस्थिती दिसून येते. भाडे नाकारणे आणि रिक्षा-टॅक्सीत जबरदस्तीने बसवण्याच्या घटना घडत असून, त्याविरोधात प्रवाशांकडून तक्रारी केल्या जात आहेत. वांद्रे आणि अंधेरी भागातून सर्वाधिक तक्रारी येत असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
भाडे जास्त मिळत नसल्याने लांब पल्ल्याचे भाडे घेणे, जादा भाडे आकारणी करणे अशा घटना सातत्याने घडत होत्या. त्यामुळे चालकांच्या मागणीनुसार रिक्षाचे भाडे १५ रुपये आणि टॅक्सीचे भाडे काही महिन्यांपूर्वीच १९ रुपये करण्यात आले. यानंतर तरी रिक्षा-टॅक्सीचालकांची मुजोरी संपेल अशी आशा मुंबईकरांना होती. मात्र ही मुजोरी न संपताच त्यांची दादागिरी सुरूच असल्याचे पुन्हा दिसून आले आहे. वांद्रे भागात रिक्षा-टॅक्सीचालकांकडून भाडे नाकारणे आणि प्रवाशाला जबरदस्तीने आपल्या वाहनात बसवण्याच्या अनेक घटना घडत असून, त्याविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाहतूक पोलिसांकडे येत आहेत. भाडे नाकारण्याच्या ३४७ आणि प्रवाशासोबत जबरदस्तीच्या १७२ तक्रारी जानेवारी ते जून २०१४मध्ये आल्या आहेत. तसेच अंधेरी एअरपोर्ट विभागातून भाडे नाकारण्याच्या १६१ आणि प्रवाशासोबत जबरदस्तीच्या १४ आणि डी.एन. नगर भागातून भाडे नाकारण्याच्या सर्वाधिक ७८८ तक्रारी आल्या आहेत. वांद्रे पूर्वेला स्थानकाबाहेरच असणाऱ्या मीटर आणि शेअर रिक्षाचालकांकडून प्रवाशांना आपल्या वाहनात बसवण्यासाठी जबरदस्ती केली जाते. या भागातूनच जास्त तक्रारी असल्याचे वाहतूक पोलीस सांगतात. (प्रतिनिधी)

Web Title: Rickshaw-taxi drivers 'dadagiri' started