"राज ठाकरेंनी मोदींच्या जवळ जावं, घाबरू नये"; RSS वरील टीकेवरुन कोश्यारींनी मनसे प्रमुखांना डिवचलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 12:42 IST2026-02-11T12:41:25+5:302026-02-11T12:42:13+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमावर राज ठाकरेंनी टीका केल्यानंतर भगतसिंह कोश्यारींनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

"राज ठाकरेंनी मोदींच्या जवळ जावं, घाबरू नये"; RSS वरील टीकेवरुन कोश्यारींनी मनसे प्रमुखांना डिवचलं
Bhagat Singh Koshyari on Raj Thackeray: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका विशेष कार्यक्रमाची सध्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरु आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्याला बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावल्याने चर्चेला उधाण आले आहे. मात्र, या उपस्थितीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे.
संघाच्या या कार्यक्रमात सरसंघचालकांनी संघाची विचारधारा आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यावर प्रकाश टाकला. मात्र, व्यासपीठापेक्षा समोरील प्रेक्षक गॅलरीची चर्चा अधिक झाली. सलमान खान, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांसारख्या बड्या सेलिब्रिटींच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कलाविश्वातील या चेहऱ्यांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
"हे प्रेमापोटी नाही, तर सत्तेच्या धाकामुळे"; राज ठाकरेंचा घणाघात
राज ठाकरे यांनी या उपस्थितीवर सडकून टीका केली. "सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका भ्रमात राहू नये. कार्यक्रमाला आलेली ही मंडळी तुमच्या विचारांवर प्रेम आहे म्हणून आलेली नव्हती. ही केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी यंत्रणांच्या धाकामुळे आणि भीतीपोटी तिथे बसली होती," असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी पुढे टोला लगावला की, आजवर कधीही अशा प्रकारच्या रटाळ व्याख्यानांना ही मंडळी फिरकली नव्हती, मग अचानक असा काय बदल झाला? सरकारी दबावामुळे ही उपस्थिती लावण्यात आली असून, भागवतांनी या गैरसमजातून लवकरात लवकर बाहेर यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भगतसिंग कोश्यारींनी राज ठाकरेंना लगावला टोला
राज ठाकरेंच्या या विखारी टीकेनंतर भाजप आणि संघ समर्थकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या वादात उडी घेतली आहे. राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना कोश्यारी यांनी त्यांना चांगलेच डिवचले.
"संघासोबत जोडले जाणारे लोक हे पंतप्रधान मोदींना घाबरलेले नाहीत. मी राज ठाकरे यांचा खूप आदर करतो. पण ते पंतप्रधान मोदींना जास्तच घाबरले आहेत असं मला वाटतं. त्यांनी घाबरु नये. राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या जवळ जायला हवं, त्यांच्यासाठी सगळे सारखेच आहेत. पंतप्रधान मोदींना घाबरु नका असं मी त्यांना सांगणार आहे. महाराष्ट्रातले आहात त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. घाबरायचं असेल तर चुकीच्या कामांसाठी घाबरा," असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.