BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 12:51 IST2025-08-21T12:48:39+5:302025-08-21T12:51:10+5:30
Mumbai BEST Election 2025 Result: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आल्यानंतर या भेटीचे कारण स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालावरही प्रतिक्रिया दिली.

BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
Best Election 2025 Result: गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. बेस्ट पतपेढीतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना आणखी बळ मिळाले. परंतु, पतपेढीच्या निवडणुकीत केलेली युती ठाकरे बंधूंसाठी ‘बेस्ट’ ठरली नाही. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि ठाकरे ब्रँड यांचा ‘निकाल’ लागला. ठाकरे बंधुंच्या युतीमुळे चर्चेत आलेल्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत उद्धवसेना व मनसेच्या उत्कर्ष पॅनलचा दारूण पराभव झाला. २१ जागांपैकी कामगार नेते शशांक राव पॅनलचे १४ तर भाजपचे आ. प्रसाद लाड यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे ७ उमेदवार विजयी झाले. या निवडणूक निकालानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत असून, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यासंदर्भात प्रथमच स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी ९ वाजता राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. सुरुवातीला ही भेट कशासंदर्भात होती, याबाबत बरेच तर्क लढवण्यात आले. परंतु, लगेचच राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन या भेटीमागील कारण सांगितले. पत्रकारांशी संवाद साधत असलेल्या राज ठाकरे यांना बेस्ट पतपेढीच्या निवडणूक निकालाबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली.
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
बेस्ट निवडणूक निकालावर राज ठाकरे नेमके काय म्हणाले?
बेस्ट पतपेढी निवडणुकीचे निकाल आले आहेत, असे सांगत पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली. यावर, राज ठाकरे म्हणाले की, काय आहे ते? हा विषय मला माहितीच नाही. या निवडणुका स्थानिक आहेत. पतपेढी का काहीतरी आहे ना. पतपेढीची निवडणूक ना. ठीक आहे. या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला २४ तास काहीतरी दाखवायला हवे असते, असे सांगत याबाबतीत अधिक व्यक्त होणे राज ठाकरे यांनी टाळल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, प्रत्येक शहराचे काही नियम असतात आणि ते पाळले पाहिजेत, गाडी पार्क करण्यासाठी पार्किंग लॉट उभे करण्याची गरज आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ज्यांना तुम्ही वाहन परवाने देता, त्यांना गाडी कुठे पार्क करायची हे शिकवले जात नाही. कोणत्याही प्रकारची भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. सरकार अशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवत आहे. अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.