आईला त्रास देण्यासाठी बॉम्ब ठेवल्याचा फोन

By Admin | Updated: September 1, 2015 01:31 IST2015-09-01T01:31:55+5:302015-09-01T01:31:55+5:30

‘अंधेरी रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला आहे,’ असा निनावी फोन मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइनवर आला आणि शहर पोलिसांसह रेल्वे पोलिसांची शोधमोहीम सुरू झाली

A phone to put a bomb to harass the mother | आईला त्रास देण्यासाठी बॉम्ब ठेवल्याचा फोन

आईला त्रास देण्यासाठी बॉम्ब ठेवल्याचा फोन

मुंबई : ‘अंधेरी रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवला आहे,’ असा निनावी फोन मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइनवर आला आणि शहर पोलिसांसह रेल्वे पोलिसांची शोधमोहीम सुरू झाली. मात्र यात तथ्य नसल्याचे आढळले. या घटनेमागील आरोपीचा शोध घेतला असता आईला त्रास देण्यासाठी मुलानेच आईच्या मोबाइलवरून बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन केल्याचे उघडकीस आले. यानंतर २0वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली.
सांताक्रुझ पूर्व परिसरातील कुंचीपुडी येथे अविनाश जाधव (२0) आपली आई, बायको आणि मुलासह राहतो. अविनाश मुंबई महापालिकेत कंत्राटी कामगार असून, तो कचरा गोळा करण्याचे काम करतो. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाशने अहमदाबादला सासुरवाडीला जाण्याचा निर्णय घेतला होता आणि यासाठी त्याने आईकडे ५00 रुपयांची मागणी केली होती. त्यावरून आईसोबत त्याचे कडाक्याचे भांडण झाले. पैसे न दिल्याचा रागाने त्याने २८ आॅगस्ट रोजी रात्री मुंबई पोलिसांच्या १00 नंबरवर फोन केला आणि अंधेरी स्थानकात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. ही माहिती तत्काळ रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला (जीआरपी) देण्यात आली. माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या मदतीने अंधेरी स्थानकाची तपासणी केल्यानंतर यात तथ्य नसल्याचे आढळले. पोलिसांनी ज्या नंबरवरून कॉल आला त्या नंबरवर वारंवार कॉल केला. मात्र मोबाइल बंद होता. खोटी माहिती मिळाल्याने अंधेरी पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपास केला असता फोन सांताक्रुझमधील कुंचीपुडीमधून आल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून ३0 आॅगस्ट रोजी पोलिसांनी अविनाश जाधव याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. पैसे दिले नाहीत म्हणून आईला त्रास देण्यासाठी तिच्याच मोबाइलवरून निनावी फोन केल्याचे त्याने सांगितले. अविनाश जाधवला
३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: A phone to put a bomb to harass the mother