उठो पार्थ, पुराने पेडों को दूर हटाव, बाकी ‘देवा’क काळजी
By अतुल कुलकर्णी | Updated: May 17, 2026 09:01 IST2026-05-17T09:00:25+5:302026-05-17T09:01:46+5:30
२७ वर्षांत पक्षाला कधीही २७ खासदार एका वेळी निवडून आणता आले नाहीत. तेव्हा त्या जुन्या-जाणत्या नेत्यांनी काय केले, हे त्यांना विचारा.

उठो पार्थ, पुराने पेडों को दूर हटाव, बाकी ‘देवा’क काळजी
- अतुल कुलकर्णी
संपादक, मुंबई
प्रिय पार्थ,
आपले काम वेगानेही सुरू आहे. अशावेळी जुने नेते आम्हीच पक्ष मजबूत केला, असे सांगत येतील. ते अर्ध्यसत्य आहे, हे लक्षात ठेवा. जर त्यांनी पक्ष मजबूत केला असता तर आपण पश्चिम महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलो नसतो. आपल्या काकांनी काँग्रेसमधून बंड करत १० जून १९९९ रोजी म्हणजे २७ वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केला. आपल्या पिताश्रींनीही बंडाचा कित्ता गिरवत २ जुलै २०२३ रोजी वेगळी राष्ट्रवादी केली. या संपूर्ण प्रवासात काकांची राष्ट्रवादी १० आमदार आणि ८ खासदार एवढी, तर आपल्या पिताश्रींची राष्ट्रवादी १ खासदार आणि ४१ आमदार एवढीच राहिली. २७ वर्षांत पक्षाला कधीही २७ खासदार एका वेळी निवडून आणता आले नाहीत. तेव्हा त्या जुन्या-जाणत्या नेत्यांनी काय केले, हे त्यांना विचारा.
मोठ्या झाडाखाली छोटे झाड वाढत नाही, हे तुमच्या पक्के लक्षात आले आहे. परवा सुनील तटकरे यांनी बोलताना आपल्या ४२ वर्षांच्या राजकीय पक्षकार्याचा संदर्भ दिला. हे खरे आहे की, ४२ वर्षे ते सक्रिय राजकारणात आहेत. त्यातली काही वर्षे त्यांनी आपल्या पक्षासोबत अजित दादांसोबत खांद्याला खांदा लावून लढण्याचे काम केले. म्हणून तुम्हीसुद्धा तेच करावे असे नाही. ती त्यांची गरज होती. आता त्यांना बाजूला करणे ही तुमची गरज झाली आहे. लोकं नावं ठेवतील. पार्थला वागायचे कळत नाही, असेही म्हणतील. असे म्हणणाऱ्यांचे हेतू लक्षात ठेवा...
तसेही आपला पक्ष हा सुभेदारांचा पक्ष आहे. मोठ्या साहेबांपासून दादांपर्यंत, सगळ्यांनी निवडून येणाऱ्यांनाच तिकिटे दिली. प्रत्येकाने आपापले मतदारसंघ सुभेदारासारखे वाढवले. निवडणुकीत अनेकांना आपला पक्ष तिकिटापुरता हवा होता. आता तुम्ही सगळी जबाबदारी अंगावर घेतलीच आहे. अजितदादांचे चिरंजीव म्हणूनच आपल्याकडे पक्षाचे नेतृत्व आयते चालून आले आहे. काकांमुळे पुतणे मोठे झाले. पुतण्यामुळे त्यांचे चिरंजीव पुढे आले. यात वेगळे काही नाही. परंपरेने असेच होत असते...
तुम्ही सगळी जबाबदारी अंगावर घेतलीच आहे. तेव्हा तुम्हाला काही पथ्य पाळावी लागतील. मी चाळीस वर्षे दादांसोबत आहे, असे सांगत येणाऱ्या नेत्यांना तुमच्यापासून २७ हात दूर ठेवा. पक्षवाढीसाठी ज्या नेत्यांनी सहकार्य केले त्या नेत्यांनी त्यांच्या घरातल्या किती पोराबाळांना तिकिटं दिली? सक्रिय राजकारणात आणले? याची नोंद ठेवणे सुरू करा. ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे..! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना सक्रिय राजकारणात आणण्याची टुकार स्वप्ने बघू नका. आपल्याकडे कोणी अशी स्वप्न बघत असेल त्यांना घरी पाठवा. आपला पक्षच मुळात निवडून येणाऱ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. नात्यागोत्यांच्या पलीकडे काहीही नसते हे लक्षात ठेवा. गायकाचे मूल गायकच होणार... आपण नाही का दादांचे चिरंजीव म्हणून पक्षावर ताबा मिळवला आहे... सगळीकडे असेच असते.
आपला पक्ष थोडाच भाजपसारखा आहे..? भाजपमध्ये चौथ्या रांगेत बसलेला माणूसही मुख्यमंत्री होऊ शकतो. आपल्याकडे असे झाले तर..? असला विचार करू नका. अशा विचारांमुळे फक्त झोप उडते. बाकी काही होत नाही. कारण त्यासाठी मोठे केडर लागते. एका विशिष्ट विचाराने प्रेरित होणाऱ्या लोकांची फौज उभी करावी लागते. खूप कष्टाचे आणि मेहनतीचे काम आहे ते... एका पिढीने लावलेले रोप मोठे होऊन त्याची फळे खायला पुढच्या दोन-तीन पिढ्या जाव्या लागतात. आपल्याला तेवढा वेळ नाही. ज्यांना आपला पक्ष सोडून जायचे असेल त्यांना खुशाल जाऊ द्या. जाऊन-जाऊन ते भाजपमध्येच जातील. दुसरीकडे जाण्यासाठी त्यांना सोय नाही. तिथे गेले की, निदान रात्री शांत झोप तरी लागते, असे तिकडे जाऊन आलेल्या आपल्या इंदापूरच्या नेत्याने जाहीरपणे सांगितले होते. आपल्यालाही शांत झोप लागायची असेल, पुण्याच्या महसूल विभागाचा रिपोर्ट बाहेर येऊ नये असे वाटत असेल, बसल्या जागी पक्ष वाढवायचा असेल, मंत्रिपद, खासदारकी
टिकवायची असेल तर ‘देवा’क काळजी म्हणा आणि शांत बसा... आज तरी आपण एवढेच करू शकतो. विनाकारण कष्ट करायच्या भानगडीत पडू नका. ‘देवा’ला भाऊ माना आणि ‘देवा भाऊ की जय’ म्हणा..! यातच आपले आणि आपल्या पक्षाचे हित सामावलेले आहे.
- तुमचाच बाबूराव