पंकजा मुंडे यांच्या हल्लाबोलमुळे भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 03:49 AM2019-12-13T03:49:29+5:302019-12-13T06:10:40+5:30

ओबीसी, खुली व्होट बँक दुर्लक्षाची भावना

Pankaja Munde's attack caused an upset in the BJP | पंकजा मुंडे यांच्या हल्लाबोलमुळे भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता

पंकजा मुंडे यांच्या हल्लाबोलमुळे भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता

Next

- यदु जोशी

मुंबई : माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीतील गुरुवारच्या मेळाव्यात जो हल्लाबोल केला त्यामुळे भाजपमध्ये सगळेकाही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. या निमित्ताने पक्षनेतृत्वाने ‘डॅमेज कंट्रोल’ लगेच हाती घेतले नाही, तर पक्षात एकोपा नसल्याचे चित्र कायम राहील आणि ते पक्षासाठी हिताचे नसेल, अशी भावना आहे.

ओबीसी व खुल्या प्रवर्गातील जाती ही भाजपची परंपरागत व्होट बँक. तथापि, गेल्या पाच वर्षांत या व्होट बँकेला फारसे महत्त्व न देता मराठा समाजाला तसेच या समाजातील नेतृत्वाला जास्त महत्त्व देण्यात आल्याची नाराजी काही प्रमाणात का होईना पण भाजपमध्ये आहे. पक्ष मूठभर लोकांच्या हातून बहुजनांपर्यंत नेण्याचे मोठे श्रेय गोपीनाथ मुंडे यांना दिले जाते. त्यांच्या कन्या पंकजा यांची नाराजी पक्षाला परवडणारी नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर दिली. ‘आपण जवळचं सोडून पळत्याच्या मागे धावलो आणि घात झाला’, अशीही एक प्रतिक्रिया असून या पार्श्वभूमीवर सामाजिक समीकरणांचा भाजपला पुनर्विचार करावा लागेल, असे बोलले जात आहे.

पंकजा यांनी आज पक्ष सोडला असता तर पक्षाचे एकदाच काय व्हायचे ते नुकसान झाले असते पण आज त्यांनी पक्षातच राहणार असल्याचे सांगत जो हल्लाबोल केला. त्यामुळे पुढील काळातही पक्षांतर्गत वादावादीचे, संघर्षाचे प्रसंग उद्भवत राहतील आणि त्याचा फटका पक्षाला बसत राहील, असे म्हटले जात आहे. वस्तूत: विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे हे दोघेही भाजपमधील ‘मुंडे स्कूल’चे विद्यार्थी.

नागपुरात नितीन गडकरी या आपल्या परंपरागत पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्याला अटकाव करण्यासाठी मुंडे यांनी फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष केले व त्यातूनच फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग पुढे सुकर झाला. मात्र, एकाच ‘स्कूल’च्या या दोन विद्यार्थ्यांमध्ये आज दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

पंकजा मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पाठीशी राज्यातील तमाम बहुजन समाज एकवटला असल्याचे म्हणणे धारिष्ट्याचेच ठरेल. भाजपमधील बव्हंशी ओबीसी आमदार, पदाधिकारी हे फडणवीस यांच्यासोबतच आहेत. पंकजा स्वत:चा पराभव टाळू शकल्या नाहीत आणि खडसे यांना स्वत:च्या कन्येला निवडून आणता आले नाही, ही दुसरी बाजू आहेच पण, खडसे यांच्यात उपद्रव्य मूल्य कायम आहे आणि पंकजा यांना मुंडेकन्या म्हणून विशिष्ट ओबीसी समाजात आजही मान्यता आहे हेही वास्तव आहे. वडिलांची पुण्याई त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे या दोघांना पूर्णत: दुर्लक्षित करणे भाजपला कितपत परवडेल हा प्रश्न आहे.

पंकजा मुंडे यांच्या चिक्की प्रकरणात झालेल्या बदनामीमध्ये वा परळीतील पराभवात त्यांच्या ‘स्कूलमेट’चा हात होता असे जर त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमजच नाही तर ती त्यांची राजकीय अपरिपक्वतादेखील आहे. कारण, काट्याने काटा काढण्याचा त्या ‘स्कूलमेट’चा कपटी स्वभाव आम्हाला कधीही दिसला नाही असे भाजपचे आमदार सांगतात.

फडणवीस यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांना बळ देत मतदारसंघात आपले खच्चीकरण केले अशी पंकजा यांची भावना असल्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे पक्षातील नेत्याविरुद्ध विरोधकांना फडणवीस यांनी बळ दिल्याचे एकही उदाहरण त्यांच्या कारकिर्दीत नसल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. देवेंद्र-पंकजा यांच्यातील दुराव्यामागे समजांऐवजी गैरसमजच अधिक आहेत. पंकजा यांनी गुरुवारच्या मेळाव्यात केलेला हल्लाबोल पक्षश्रेष्ठींना रुचलेला नाही, अशी बातमी लगोलग ‘सूत्रांच्या’ हवाल्याने पसरविण्यात आली. तीदेखील फडणवीस यांनी पसरविल्याचा पंकजा यांचा गैरसमज होऊ शकतो. असे सगळे गैरसमज दूर करण्यासाठी सध्यातरी कोणी पुढाकार घेताना दिसत नसल्याने पक्षात बेकी असल्याचे चित्र कायम राहील, असे दिसते.

Web Title: Pankaja Munde's attack caused an upset in the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.