अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा केवळ अंदाजच

By Admin | Updated: March 13, 2015 22:51 IST2015-03-13T22:51:52+5:302015-03-13T22:51:52+5:30

अवकाळी पावसाने ठाण्यासह पालघर जिल्ह्याला तीन दिवस झोडपून काढले असता आंब्यासह मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

The only approximation of the sudden loss of monsoon | अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा केवळ अंदाजच

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा केवळ अंदाजच

सुरेश लोखंडे, ठाणे
अवकाळी पावसाने ठाण्यासह पालघर जिल्ह्याला तीन दिवस झोडपून काढले असता आंब्यासह मिरचीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे ७१० हेक्टरवरील आंब्यांच्या बागांसह सुमारे १५०० हेक्टरवरील मिरचीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
हा अहवाल तयार करण्यास गती नसल्याचे वृत्त लोकमतने सुमारे पाच दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले असता त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासन कामाला लागले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांद्वारे आदेश काढून संबंधितांना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. यानुसार, पंचनामे करून त्यांचा अहवाल तयार करण्याचे काम दोन्ही जिल्ह्यांत सुरू झाले आहे.
फळबागांसह सुमारे १५०० हेक्टरवरील मिरची पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. याप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी महसूल, पुनर्वसन विभागासह कृषी खात्याचे अधिकारी-कर्मचारी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पंचनामे करीत आहेत. मिरची नुकसानीप्रमाणेच दोन्ही जिल्ह्यांतील सुमारे ७१० हेक्टर्सवरील आंब्यांच्या बागांचे नुकसान झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी सांगितले.
पंचनामे करताना शेतीचे नुकसान ५० टककयांच्या आत आहे किंवा कसे, असा अहवाल करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रशासनाद्वारे अद्याप प्राथमिक अंदाजच आहे.

Web Title: The only approximation of the sudden loss of monsoon