मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 06:54 IST2026-05-02T06:54:45+5:302026-05-02T06:54:45+5:30
या कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहारपर्यंत जलद मार्गावर वळविण्यात येतील.

मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
मुंबई - मध्य रेल्वेवर नीट परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द केला आहे. असे असले तरी शनिवारी मध्यरात्री धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत मशीद, सॅण्डहर्स्ट, चिंचपोकळी, करी रोड येथे लोकल थांबणार नसल्याने या स्थानकांवर ब्लॉकपूर्वीची शेवटची टिटवाळा लोकल रात्री ११:१६ वाजताची असेल.
मुख्य मार्ग
सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप व डाउन धिम्या मार्गांवर रात्री १२.०५ ते पहाटे ५.०५ वाजेपर्यंत ब्लॉक राहील. या कालावधीत सीएसएमटीहून सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहारपर्यंत जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील.
ट्रान्स हार्बर मार्ग
ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान शनिवारी रात्री ११.४५ ते रविवारी पहाटे ४.४५ वाजेपर्यंत अप-डाउन सेवा पूर्णपणे बंद राहतील. या कालावधीत काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकपूर्वी ठाणे-पनवेल शेवटची गाडी रात्री ११.१४ वाजता सुटेल, तर ब्लॉकनंतर पहिली सेवा पहाटे ५.१२ वाजता सुरू होईल.
‘परे’वर राम मंदिर ते जोगेश्वरी दरम्यान १० तासांचा मेगाब्लॉक
मेट्रो-६ प्रकल्पासाठी स्टील गर्डर लाँचिंगच्या महत्त्वाच्या कामामुळे पश्चिम रेल्वेकडून राम मंदिर ते जोगेश्वरी स्थानकांदरम्यान १० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्रीपासून ते रविवारी सकाळपर्यंतच्या ब्लॉकमुळे उपनगरी लोकल सेवांवर परिणाम होणार आहे. शनिवारी रात्री ९:३० वाजल्यापासून रविवारी सकाळी ७:३० वाजेपर्यंत सहाव्या मार्गावर हा १० तासांचा ब्लॉक लागू राहणार आहे. याशिवाय, अप जलद मार्ग आणि पाचव्या मार्गावर पहाटे १ ते ४ या वेळेत अतिरिक्त ब्लॉक घेतला जाणार आहे, ज्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर अधिक ताण येण्याची शक्यता आहे.
ब्लॉक कालावधीत सहाव्या मार्गावरील सर्व गाड्या बोरीवली ते अंधेरी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. दरम्यान, बरौनी-बांद्रा टर्मिनस अवध एक्स्प्रेस (गाडी क्र. १९०३८) सूरत ते बोरीवली दरम्यान सुमारे ३० मिनिटे उशिराने धावेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.