NCP Jitendra Awhad Slams BJP On Pragya Singh Thakur Select defence panel | प्रज्ञा सिंहांच्या 'त्या' वक्तव्यावर मोदी इतके नाराज झाले अन् रागाच्या भरात...; आव्हाडांचा निशाणा

प्रज्ञा सिंहांच्या 'त्या' वक्तव्यावर मोदी इतके नाराज झाले अन् रागाच्या भरात...; आव्हाडांचा निशाणा

नवी दिल्ली: भाजपाने भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर वादग्रस्त वक्तव्य करुन नेहमीच चर्चेत असतात. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर देखील भाजपाने प्रज्ञा सिंहला लोकसभेची तिकिट दिल्याने विरोधकांनी भाजपावर निशाणा साधला होता. पंतप्रधान मोदींनी देखील प्रज्ञा सिंहच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता भाजपानेच प्रज्ञा सिंह यांना संरक्षण मंत्रालयाच्या समितीत स्थान दिल्याने पुन्हा एकदा विरोधकांनी भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रज्ञा सिंह यांच्यासह पंतप्रधानांवर टीकास्त्र सोडले आहे.

जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले की, माझ्या शापामुळे हेमंत करकरेंचा मृत्यू झाला या प्रज्ञा सिंह ठाकूरच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके नाराज झाले की त्यांनी रागाच्या भरात प्रज्ञा सिंह यांना शिक्षा म्हणून संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीत स्थान दिलं असं म्हणत भाजपाच्या या भूमिकेवर टीका केली आहे.

संरक्षण खात्याच्या समितीत अध्यक्षस्थानी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फारुख अब्दुल्ला, ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, मीनाक्षी लेखी, राकेश सिंह, भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा या नेत्यांचा समावेश आहे. 

प्रज्ञा सिंह या 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकारातील आरोपी असून त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रज्ञा सिंह यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली होती. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे देशभक्त होता. मी त्यांना राष्ट्रवादी मानते, असे त्या म्हणाल्या होत्या. 26/11 हल्ल्यात शहीद झालेले दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे माझ्या शापाने मरण पावले, असे देखील त्या म्हणाल्या होत्या. या दोन्ही विधानांमुळे ठाकूर यांनी पक्षाला अडचणीत आणले होते. तसेच  पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्वच्छ भारत योजनेवर टीका केल्यानं भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर अडचणीत आल्या आहेत. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ठाकूर यांना नोटीस पाठवली आहे. त्यांच्या विधानावर नेतृत्त्व पक्ष नाराज असल्याचं नड्डा यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना सुनावलं. यासाठी ठाकूर यांना दिल्लीतील मुख्यालयात बोलावण्यात आलं होतं. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: NCP Jitendra Awhad Slams BJP On Pragya Singh Thakur Select defence panel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.