मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 22:37 IST2025-09-17T22:34:00+5:302025-09-17T22:37:02+5:30
Meenatai Balasaheb Thackeray Statue Dadar: या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने कृत्याची कुबली देताना काही धक्कादायक खुलासे केल्याचे बोलले जात आहे.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
Meenatai Balasaheb Thackeray Statue Dadar: दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. अज्ञातांनी या पुतळ्यावर लाल रंग फेकला, सकाळी ही गोष्ट शिवसैनिकांच्या निदर्शनास येताच एकच गर्दी झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली. पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल तात्काळ गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पहिली अटक झाली असून, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने केलेल्या कृत्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपेंद्र पावसकर असे या व्यक्तीचे नाव आहे. ठाकरे गटातील कार्यकर्त्याचा हा चुलत भाऊ असल्याचे म्हटले जात आहे. श्रीधर पावसकर हा बाळासाहेब ठाकरे यांचा सुरक्षा रक्षक होता. काही कारणांमुळे त्याला काही वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. श्रीधर पावसकर चा भाऊ गुणाजी पावसकर असून, या गुणाजी पावसकरचा मुलगा उपेंद्र पावसकर आहे. उपेंद्र पावसकर यानेच रंग टाकल्याचे सांगितले जात आहे.
संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप
पोलिसांनी अटक केल्यानंतर सदर व्यक्तीने जबाबात धक्कादायक माहिती दिली. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप या व्यक्तीने केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी सातत्याने यायचा, असेही म्हटले आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.
राज ठाकरे यांनी दिली पुतळ्याच्या ठिकाणी भेट
या प्रकाराची माहिती मिळताच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी भेट दिली. तिथे संबंधित पोलीस अधिकारी यांच्याशी राज ठाकरे यांनी संवाद साधला. त्यावेळी परिसरातील सगळे सीसीटीव्ही चेक करा, २४ तासांत या आरोपीला शोधून काढा अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
उद्धव ठाकरे झाले होते आक्रमक
हा प्रकार निंदनीय आहे. ज्याला स्वत:च्या आई वडिलांची लाज वाटते, अशा नराधमाने, बेवारस व्यक्तीने ही गोष्ट केली असावी किंवा बिहारमध्ये ज्या प्रकारे मोदींच्या आईचा अपमान झाला म्हणून बिहार बंद करण्याचा असफल प्रयत्न झाला तसा महाराष्ट्र पेटवण्याचे काम कुणी करत असेल. आमच्या भावना तीव्र आहेत. आम्ही शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस या घटनेतील आरोपीचा शोध घेत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
दरम्यान, ही घटना अतिशय निंदनीय आहे, कोणालाही सोडले जाणार नाही. यासंदर्भात मी स्वतः पोलीस आयुक्तांशी बोललो आहे, मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे, ही बाब गांभीर्याने घेतल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर, अशा प्रकारची घटना निषेधार्हच आहे. ज्या कोणत्या समाजकंटकाने ही घटना केली आहे, त्याला पोलीस शोधून काढतील. त्याच्यावर कारवाई केली जाईल. यापेक्षा याला जास्त राजकीय रंग देणे, हे मला योग्य वाटत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.