Join us

“अजितदादांचा मुलगा अन् पत्नीही निवडून आले नव्हते”; राज ठाकरेंवरील टीकेवर मनसेचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 17:24 IST

MNS Sandeep Deshpande News: मनसेला मते मिळाली, ती राज ठाकरेंच्या जीवावर मिळाली. भाजपाचा पदर पकडला, मोदींचे नाव घेतले म्हणून मते मिळाली नाहीत. अजित पवारांनी एकट्याच्या जीवावर उभे राहावे आणि मग या वल्गना कराव्यात, अशी टीका करण्यात आली आहे.

MNS Sandeep Deshpande News: राज्यभरात अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बीड, परभणी, मराठा आरक्षण यांसह महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधक ईव्हीएम मशीनवर मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित करत केंद्रीय निवडणूक आयोग आणि भाजपावर टीका करत आहेत. ईव्हीएमवरील टीकेला महायुतीतील नेतेही उत्तर देताना पाहायला मिळत आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. तसेच अजित पवार यांना ४२ जागा आणि शरद पवार यांना इतक्या कमी जागा कशा मिळाल्या असा सवालही राज ठाकरेंनी केला होता. यावर बोलताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या पराभवाचा उल्लेख केला आहे. राज ठाकरेंनी निवडणूक निकालावर केलेल्या  वक्तव्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आमच्यावर गप्पा मारता. या वेळेस आम्ही कष्ट घेतले होते, मेहनत घेतली होती. तुम्ही सगळे बघत होता, असे अजित पवार यांनी म्हटले होते. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे. 

अजित पवारांचा मुलगा अन् पत्नीही निवडून आले नव्हते

अजित पवारांचा मुलगा निवडून आला नव्हता. अजित पवार यांच्या पत्नीदेखील निवडून आल्या नव्हत्या. आम्ही जी काही निवडणूक लढवली आणि आम्हाला जी काही मत मिळाली ती राज ठाकरेंच्या जीवावर मिळाली. भाजपाचा पदर पकडला किंवा पंतप्रधान मोदींचे नाव घेतले म्हणून आम्हाला ही मत मिळालेली नाहीत. अजित पवारांना जी मत मिळाली आहेत, ती भाजपासोबत लग्नगाठ बांधली म्हणून ती मिळाले. त्यांनी एकट्याच्या जीवावर उभे राहावे आणि मग या वल्गना कराव्यात, असा पलटवार संदीप देशपांडे यांनी केला. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत विरोधकांमध्ये एकी नसल्याने हा निकाल दिसला

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, दिल्लीची परिस्थिती ही वेगळी आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे निकाल लागले आणि सहा महिन्यांनी हे निकाल बदलले गेले. त्याच्यावर अनेकांनी शंका उपस्थित केल्या आहेत. फक्त राजकीय नव्हे तर सामाजिक संस्थांकडूनही यावर शंका उपस्थित करण्यात आली आहे. यात पारदर्शकता आली पाहिजे, असे मला वाटते. तसेच विरोधकांमध्ये एकी नसल्याने त्याचा परिणाम हा दिल्लीच्या निकालावर दिसला. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस जर एकत्र लढले असते तर कदाचित दिल्लीचे चित्र थोडे वेगळे दिसले असते, असे संदीप देशपांडे म्हणाले.

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते, पदाधिकारी यांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर एक महत्त्वाची बैठक पार पडली. याबाबत बोलताना, आमची पक्षवाढीसाठी बैठक झाली. यावेळी संघटनात्मक पातळीवर चर्चा झाली, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले. 

टॅग्स :संदीप देशपांडेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामनसेराज ठाकरेअमित ठाकरेअजित पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपामहायुती