MLA Ashish Shelar dismisses claims of BJP MLA split from Party | या तर चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार फुटण्याचा दावा आशिष शेलारांनी फेटाळला
या तर चोराच्या उलट्या बोंबा; भाजपा आमदार फुटण्याचा दावा आशिष शेलारांनी फेटाळला

मुंबई - राज्यातील सत्तांतरानंतर भाजपाला मोठा धक्का बसणार असल्याचं वृत्त आहे. राज्यसभा खासदारासह काही आमदारभाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती आहे. मात्र आपल्या सह सोबत आलेल्या अपक्ष आमदारांना आश्वासन देऊन ठेवली. प्रत्यक्षात सरकार स्थापन होऊन आठ दिवस होत आलेतरी साधे खातेवाटही करू शकले नाही. दिलेली आश्वासने पूर्ण करु शकत नाही त्यामुळे तिघाडीच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. ती लपविण्यासाठी आता भाजपच्या नावाने उलट्या बोंबा मारल्या जात आहेत. या चोराच्या उलट्या बोंबा आहेत अशा शब्दात भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. 

भाजपातील डझनभर आमदार फुटणार असे धादांत खोटे आणि वास्तवाशी कुठलाही संबंध नसलेले वृत्त आज सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही निव्वळ अफवा आहे. तिघाडीच्या नेत्यांकडून अशा अफवा पसरवण्यात येत आहेत. चोराच्या उलट्या बोंबा मारणे सुरु आहे. भाजपामध्ये अन्य पक्षातून आलेले असो वा मुळ भाजपाचे असलेले आमदार सर्व पक्ष शिस्त पाळणारे आहेत. त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा,आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जे काम केले त्यामुळेच आश्वासक, प्रभावी, पारदर्शी नेतृत्वावर विश्वास ठेऊन अन्य पक्षातून अनेक आमदार भाजपमध्ये आल्याचा दावा आशिष शेलार यांनी केला आहे. 

दरम्यान, सत्ता स्थापनेच्या काळात भाजपला या सर्व आमदारांवर विश्वास असल्यानेच त्यांना तिघाडीच्या आमदारांप्रमाणे डांबून ठेवावे लागले नाही. कुणीही कुठल्याही प्रकारे पक्ष शिस्त मोडली नाही. तिन्ही पक्षांनी आमदारांना डांबून ठेवले. मोठमोठी आश्वासनं दिली. प्रत्यक्ष आता काहीच घडत नाही. त्यामुळे त्यांच्याच आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. सध्या तिघाडीचे जे सुरु आहे ते पाहून भाजपमध्ये अन्य पक्षातून आलेले आमदार म्हणत आहेत की, बरे झाले आम्ही भाजपात आलो असंही शेलार यांनी सांगितले. 

तसेच आम्ही 105 आमदार संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिशी असून अनेक लोककल्याणकारी प्रकल्प बंद करून विनाशाचे काम करणाऱ्या या सरकारला लोकांच्या प्रश्नांवर आम्ही सळो की पळो करुन सोडू, सत्तेची विनाशकारी तिघाडी केलेल्या या पक्षांनी जरा आपल्या पक्षातील आमदारांच्या मनात नेमके काय चाललेय? त्याचा एकदा कानोसा घ्यावा असा सल्ला ही आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला दिला आहे. 
 

Web Title: MLA Ashish Shelar dismisses claims of BJP MLA split from Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.